छत्रपती संभाजीनगर Cerebral Palsy : शरीर व्याधीनं ग्रासलं असलं तरी मानसिक स्वास्थ उत्तम असल्यास, त्यावरही मात करु शकतो, याचा प्रत्यय संभाजीनगर येथील तेरा वर्षीय रुद्र पांडे यानं करवून दिलाय. 'सेरेब्रल पाल्सी' म्हणजे मेंदूशी निगडित असलेल्या या दुर्मिळ आजारानं त्रस्त असताना देखील त्यानं राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलय. कुटुंबीयांनी दिलेल्या विश्वासामुळं त्यानं या स्पर्धेत राज्याचं नेतृत्व केलंच मात्र पदक जिंकून देशात अव्वल स्थान मिळवता आलंय. कराटे खेळ प्रकारातील तायक्वांदो फुंशे या वैयक्तिक खेळ प्रकारात त्यानं ही कामगिरी केल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झालाय.
रुद्रनं पटकावलं सुवर्ण पदक : 'सेरेब्रल पाल्सी' या आजारानं त्रस्त असलेल्या मात्र खेळामध्ये आपली चमक दाखवणाऱ्या खेळाडूंसाठी 'सेरेब्रल पाल्सी फेडरेशन ऑफ इंडिया'तर्फे दरवर्षी खेळांचं आयोजन करुन अशा मुलांना प्रोत्साहन दिलं जातं. यंदा चंदिगड इथं मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 13 राज्यातील 'सेरेब्रल पाल्सी'ग्रस्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील तेरा वर्षीय रुद्र पांडे यानंही सहभाग नोंदवला होता. "रुद्र गेल्या काही वर्षांपासून तायक्वांदो हा कराटे प्रकार शिकण्याचा सराव करतो. रोज सकाळी शाळेत जायचं आणि आल्यावर सायंकाळी दोन तास तो सराव करायचा. हौशी तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष केड शार्दुल, सचिव नीरज बोरसे, लता कलवार यांच्यासह इतर सदस्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं तो राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकला," असं मत रुद्रचे वडील सुशांत पांडे यांनी व्यक्त केलंय.
रुद्र पांडे 'सेरेब्रल पाल्सी' आजारानं ग्रस्त : आठव्या वर्गात शिकणारा रुद्र पांडे जन्मतःच 'सेरेब्रल पाल्सी' या आजारानं ग्रस्त आहे. 'सेरेब्रल पाल्सी' हा आजार मेंदूशी निगडित असतो. जन्मतःच मेंदूची वाढ सामान्य प्रमाणात होत नसल्यानं शरीरात अशक्तपणा आणि व्याधी जडलेल्या असतात. रुद्र पांडे याला ७० टक्के इतका आजार आहे. त्याला अनेक वेळा चक्कर येणं, फिट येणं अशी लक्षणं दिसतात. डाव्या बाजूनं त्याचं शरीर पॅरालाईज म्हणजे लखवा असलेलं आहे. एका डोळ्यानं त्याची दृष्टी देखील कमी आहे. अशा या आजारानं ग्रस्त असताना देखील त्यानं राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव मोठं केलंय आणि हे सर्व त्याच्या कुटुंबीयांनी साथ दिल्यामुळे शक्य झालंय.
खेळामुळं बदललं जीवन : "'सेरेब्रल पाल्सी' हा आजार अतिशय त्रासदायक मानला जातो. या आजारातील व्यक्तीला संभाळण्यासाठी एक व्यक्ती नेहमीच सोबत गरजेची असते. त्यामुळं अशा आजाराच्या व्यक्तीला सांभाळणं कधीकधी कुटुंबीयांना देखील त्रासदायक ठरतं. मात्र रुद्रच्या कुटुंबीयांनी त्याला मानसिक स्वास्थ भक्कम करण्यात मदत केली. तो या आजारानं ग्रस्त आहे, याची त्याला जाणीव करुन दिली नाही. एका सामान्य मुलाप्रमाणं त्याला वागवलं आणि कराटे सारख्या खेळ प्रकारात त्याला तरबेज केलं. खेळामुळं त्याचं शारीरिक स्वास्थ चांगलं ठेवण्यास मदत झाली, तर दुसरीकडं आपल्याला कोणताही आजार नाही, हे त्याच्या मनामध्ये घट्ट बसवल्यामुळं मानसिक स्वास्थ देखील चांगलं झालं. तो हळूहळू खेळ शिकायला पुढं जाऊ लागला आणि त्यामुळंच त्यानं आपल्या व्याधीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलं. अशा मुलांना त्यांच्या आजाराची जाणीव करुन न देता वाढवणं आणि मानसिक सक्षम केल्यास ते चांगलं आयुष्य जगू शकतात," असा विश्वास रुद्रची आई गौरी पांडे यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा :