पुणे : पुण्यात गुरुवारी (19 डिसेंबर) सहजीवन व्याख्यानमालेअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांचे ‘विश्वगुरू भारत’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी राम मंदिर आणि हिंदू धर्मासंदर्भात संदर्भात मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? : यावेळी बोलत असताना मोहन भागवत म्हणाले की, "धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची (Ram Temple) निर्मिती झालीय. ती योग्यच आहे. परंतु, मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही." तसंच भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही, असंही ते म्हणाले. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भाजपाला उद्देशून हे विधान केल्याचं बोललं जात आहे.
हिंदू धर्म हा शाश्वत धर्म : हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीनं शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 22 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. गुरुवारी या महोत्सवाचं उद्घाटन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलत असताना भागवत म्हणाले की, "हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून या चिरंतन आणि सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचं पालन करतात. हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे. सेवा करताना कायम प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात. सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा. मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हावा."
अल्पसंख्यांकांची अवस्था लक्षात घेणं गरजेचं : पुढं ते म्हणाले, "आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो. मात्र, इतरत्र अल्पसंख्यांकांची अवस्था काय? हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलंच पाहिजे. पण गृहस्थाश्रमापलीकडं आपल्याला जे-जे मिळालंय ते आपण सेवा रूपानं दुप्पट द्यायला हवं. जग आपले प्रतिपालक आहे. उपभोगाची वस्तू नाही", असंही यावेळी मोहन भागवत म्हणालेत.
हेही वाचा -
- कृत्रिम अवयव नोंदणीबाबत होणार विक्रम, मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणार उपक्रम
- "प्रत्येक जोडप्याला कमीत कमी तीन अपत्य असावीत"; सरसंघचालक मोहन भागवत असं का म्हणाले?
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानाने नवीन वाद; भाजपाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास तर पुसला जात नाही ना? विरोधकांचा सवाल - Mohan Bhagwat On Shivaji Maharaj