पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. अशातच सोमवारी (21 ऑक्टोबर) पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर सुरू असलेल्या नाकाबंदीत पुणे पोलिसांकडून 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम सत्ताधारी आमदाराची असल्याचं बोललं जात असून यावर शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते संजय राऊत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केलंय. मात्र, याबाबत पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना विचारलं असता, या पैशाचा राजकीय संबंध काय? याचा अधिक तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
अधिक तपास सुरू : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेच्या दृष्टीनं नाकाबंदी करत असताना पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त केली. ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती कार MH 45 AS 2526 या क्रमांकाची असुन ती सांगोल्यातील अमोल नलावडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचं समोर आलंय. रक्कम नेमकी कुठे नेली जात होती? या रक्कमेचा वापर कशासाठी होणार होता? याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सर्व नोटा 500 रुपयांच्या : याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, "काल संध्याकाळी जवळपास सव्वा सहाच्या सुमारास खेड शिवापूर टोल नाक्यावर एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार चेक करण्यात आली. या कारमध्ये काही रक्कम असल्याचं आढळलं. त्यानंतर कार पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तिथं निवडणूक अधिकारी तसंच प्रशासनाला बोलवण्यात आलं आणि व्हिडिओ ग्राफी करत पंचनामा करण्यात आला. पंचनामा केल्यावर, जवळपास 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आणि आयकर विभागाकडे पुढील चौकशीसाठी ही रक्कम देण्यात आली. सर्व नोटा या 500 रुपयांच्या असून पूर्ण रक्कम ही 5 कोटी रुपयांची आहे. ही कार कोणाची आहे? याबाबत अधिक तपास सुरू आहे. कार मुंबईवरून कोल्हापूरला जात होती. खेड शिवापूर येथे तपासणी केली असता ही रक्कम आढळून आली.
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली रक्कम सत्ताधारी आमदाराची असल्याचं बोललं जातंय. यावर संजय राऊत आणि रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी...काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटीचा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके? - संजय राऊत, खासदार
काय झाडी...काय डोंगर…मिंधेंनी 75 कोटी पाठवले. तीन गाड्या, दोन फरार एक जप्त, एका गाडीत पाच पोती, एका पोत्यात चार खोके, एका खोक्यात पन्नास बंडल, एका बंडलात 500 च्या 100 नोटा, सांगा पाहू टोटल किती? - रोहित पवार, आमदार
हेही वाचा