नंदुरबार Nandurbar APMC : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची ओळख आहे. दरवर्षी नवीन विक्रम नंदुरबार बाजार समितीत होत असतात. (Nandurbar chilli production) गेल्या वर्षी मिरचीला विक्रमी भाव मिळाला होता तर यंदा विक्रमी आवकमुळे बाजारपेठेचा नावलौकिक झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आवक झाली असून मागील वर्षी संपूर्ण हंगामात २ लाख २५ हजार क्विंटल मिरची आवक झाली होती.
यंदा बाजारपेठेत विक्रमी आवक : नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर वसला आहे. दोन्ही राज्यातून आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पादन घेतलं जातं. नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आवक झाली आहे. ही आवक २ लाख ६० हजार क्विंटल इतकी आहे. गेल्या वर्षी मिरचीची आवक काही प्रमाणात समतोल होती. त्यामुळे यंदा मिरचीची विक्रमी आवक जास्त झाल्याचं बाजार समितीकडून कळविण्यात आलं आहे.
यंदाचे मिरचीचे भाव आणि आवक : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची बाजारात सध्या ओल्या लाल मिरचीला २५०० ते ९००० हजार पर्यंत दर मिळत आहे. तर कोरड्या लाल मिरचीला ७५०० ते १८००० हजार पर्यंतचा दर मिळत आहे. तर दररोज १०० ते १५० वाहनातून २००० क्विंटल मिरचीची आवक होत आहे. मार्च अखेर पर्यंत हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे मिरची उत्पन्नात घट होईल, असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त केला गेला होता; मात्र यंदा मिरचीची विक्रमी आवक झाल्यानं तज्ञांचा दावा फोल ठरला आहे.
यावर्षी किती मिरची येण्याची शक्यता : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीनं यावर्षी साडेतीन लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीस येण्याची शक्यता बाजार समितीनं व्यक्त केली आहे. दरवर्षापेक्षा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. दररोज शंभर ते दीडशे वाहने बाजार समितीत येत असल्यामुळे यंदा आवकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि भाव देखील स्थिर राहतील, असं बाजार समिती सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: