छत्रपती संभाजीनगर Ram Vanwas Yatra : प्रभू रामाच्या वणावसाच्या यात्रेचा मार्ग आणि त्याचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या डिजिटल सेलनं विशेष यात्रेचं आयोजन केलंय. ज्याठिकाणी प्रभु श्री राम वनवासाच्या काळात वास्तव्यास होते, त्यावेळी घडलेला घटनाक्रम अधोरेखित करत प्रत्येक ठिकाणची माती संकलित करुन एक महिन्याच्या प्रवासानंतर दीडशे युवक अयोध्येत पोहचणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून "मेरा भारत मेरा गौरव" ही संकल्पना युवकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. यात्रा झाल्यावर संकलित झालेली माहिती केंद्र सरकारला देण्यात येणार असून येणाऱ्या काळात इतर यात्रेप्रमाणे राम वन गमन यात्रा सुरु व्हावी, असा मानस आयोजकांनी व्यक्त केलाय.
वनवासाचा प्रवास उघड करण्याचा प्रयत्न : प्रभु श्रीरामांनी माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत चौदा वर्षाचा वनवास भोगला. या प्रवासात त्यांच्या सोबत घेडलेल्या घटना, प्रवासातील अडचणी, घटनास्थळ याची माहिती घेण्यासाठी रामेश्वर इथून एका महिन्याच्या यात्रेला 14 जानेवारी रोजी शुभारंभ करण्यात आला असून, 14 फेब्रुवारी रोजी अयोध्येत या यात्रेची समाप्ती होणार आहे. एका महिन्याच्या या काळात दीडशे युवक प्रभु श्रीराम ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास राहिले, कुठं कोणते प्रसंग त्यांच्या जीवनात घडले. याबाबत माहिती संकलन करत आहेत. तसंच यादरम्यान प्रत्येक ठिकाणची माती सोबत घेऊन अयोध्येत झाड लावून यात्रेची आठवण ठेवली जाणार आहे. या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी भाजपा युवा मोर्चा करणार असल्याची माहिती रामोत्सव यात्रा संचालक मलय दिक्षीत यांनी दिलीय.
यात्रेचं स्वरुप यावं यासाठी प्रयत्न : या यात्रेच्या माध्यमातून "मेरा भारत मेरा गौरव" या उपक्रमाला सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती भाजपा मीडिया सेलच्या सदस्या आणि रामोत्सव यात्रा संचालक अपूर्वा सिंग यांनी दिलीय. जगन्नाथ पुरी, ज्योतिर्लिंग यात्रा, भीमाशंकर यात्रा, अष्टविनायक यात्रा अशीच एक यात्रा श्री रामाच्या वनवास प्रवासाची व्हावी याकरिता प्रयत्न केला जातोय. ज्यामुळं युवकांना श्रीराम यांच्या विषयी अधिक माहिती मिळेल असा विश्वास यावेळी सहभागी युवकांनी व्यक्त केला. या यात्रेत संकलित केलेली माहिती केंद्र सरकारला सादर केली जाणार आहे. या यात्रेत सोशल मीडिया हाताळणारे दीडशे युवक सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रवास जण माणसापर्यंत पोहचवला जाणार असल्याची माहिती रामोत्सव यात्रा संचालक अपूर्वा सिंग यांनी दिलीय.
संभाजीनगरात यात्रा का : प्रभू श्रीराम यांच्या वनवासाच्या वास्तव्यात त्यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी अतिशय जवळचा संबंध आलाय. मारीच राक्षसानं सुवर्ण मृगाचं रुप धारण करून माता सीतेला भुरळ घातली. त्या सुवर्ण मृगाच्या कातडीसाठी माता सीतेनं भगवान श्रीरामांकडे हट्ट धरला. आपल्या पत्नीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी सुवर्ण मृग धारण केलेल्या मारीचचा धनुष्यबाणानं वेध घेत वध केला. त्यावेळी त्यांचा पहिला बाण हा त्या सुवर्णमृगाच्या खुरांना म्हणजेच पायाला लागला. खुरांना संस्कृत मध्ये 'नेऊर' असं म्हणतात. त्यामुळं ज्या ठिकाणी सुवर्ण मृगाची खूरं प्रभू श्री रामचंद्रांचा बाण लागून पडली त्या 'गंगापूर' तालुक्यातील गावाला 'नेऊर' गाव असं नाव पडलंय. त्याचप्रमाणे जिथं सुवर्ण मुगाचं कान पडलं त्या गावाला 'कानड', जिथं त्याच्या बरगड्या पडल्या त्या गावाला 'बागडी' आणि जिथं सुवर्ण मृगाची काया पडली त्या गावाला 'कायगाव' असं नाव पडलं. याशिवाय प्रभू श्रीराम चंद्रांच्या वनवासातील वास्तव्याचा छत्रपती संभाजीनगर शहराशी असलेल्या संबंधांबाबत आणखी एक संदर्भ आहे. तो म्हणजे सीता मातेनं 'लवकुश' या पुत्रास जिथं जन्म दिला आणि जिथं हे तिघेजण राहिले ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 'लहुगड नांद्रा' हे गाव आहे. त्यामुळं ही यात्रा जिल्ह्यात आली असून येथील माती घेऊन युवक अयोध्येला निघाल्याची माहिती भाजपा माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी दिलीय.
हेही वाचा :