ठाणे : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेनेला (उबाठा) धक्का देत काल राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आज (13 फेब्रुवारी) राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
भाईंना भेटलो अन् परिवारात घेण्याची विनंती केली : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. 9 तारीख म्हणजे भाईंच्या जन्मदिवस आणि माझा वाढदिवसदेखील 9 तारखेलाच असतो. भाईंना भेटलो तेव्हा एक छोटा भाऊ मागे राहिला आहे, मला परिवारात घ्या, अशी विनंती केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो, आनंद दिघे यांच्या पदस्पर्शाने ही जागा पवित्र झाली, तिथेच माझा शिवसेनेत प्रवेश होतोय. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी जिल्हाप्रमुख झालो आणि शिवसेनेत काम केले. माझ्या डोळ्यात आज अश्रू आहेत. एक डोळ्यात दु:खाश्रू आहे, तो पक्ष सोडून नवीन प्रवाहात येतोय म्हणून दु:खाश्रू आहेत. खरं तर कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावर प्रेम केलंय. भाई मुख्यमंत्री होत असताना त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही, याचं दुःख आहे, असंही राजन साळवी म्हणालेत.
राऊतमुळे दीपक केसरकरांना मंत्री केलं, पण...- साळवी : 2006 च्या पोटनिवडणुकीत हरलो, पण 2014, 2019 ची निवडणूक जिंकलो, पण 2024ला पराभव झालाय. त्या काळी विनायक राऊतमुळे दीपक केसरकरांना मंत्री केलं, पण राजन साळवी तिथेच राहिला. 2024 ला महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि आपल्याला मंत्री मिळेल, असं वाटलं होतं. पण 2006 चा पराभव आणि आता 2024 चा पराभव जिव्हारी लागलाय. विनायक राऊतला आम्हीच मोठं केलं, पण त्यांनी किरण भैय्यांचं काम केलं, परंतु आता भाईंनी मला कुटुंबात घेतलंय. मला काही नको, पण माझ्यासोबत राजापूर, लांजा, साखरपामधून आलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, अशी आशाही राजन साळवी यांनी व्यक्त केलीय.
शिंदेंसाठी तडजोड करायला मी तयार- सामंत : शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीसुद्धा राजन साळवींच्या आडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. मागच्या तीन वर्षांत तुमच्याकडे धनुष्यबाण होता, पण तो काँग्रेसच्या खांद्याला लागला होता, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी शब्द देतो की, ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचे हात बळकट होतील, त्या ठिकाणी तडजोड करायला मी तयार आहे. पूर्ण रत्नागिरी जिल्हा धनुष्यबाण अन् भगवामय करणार असल्याचंही उदय सामंतांनी बोलून दाखवलं.
बाळासाहेबांच्या पश्चात मला घरगडी नोकर म्हणून वागणूक दिली- शिंदे : विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा एकदा आपल्या गुहेत परत आलाय. खरं तर राजन साळवी आता परत आमदार झाले असते, किरण सामंत आणि उदय सामंत सारखे सांगत होते, त्यांना बोलावून तिकीट द्या, किरण सामंत यांना आमदार होण्याची संधी असतानादेखील ते सांगत होते, असंही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलंय. बाळासाहेबांच्या पश्चात मला घरगडी नोकर म्हणून वागणूक दिली म्हणून मला उठाव करावा लागला. इतिहासात नोंद होईल एवढी काम केलीत. किरण सामंत अन् उदय सामंत सांगत होते, पक्ष मोठा करण्यासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे. सुबह का भूल शाम तक घर आ जाये तो उसे भूला नहीं कहते, कोणत्याही अटी शर्थी न ठेवता तुम्ही आलात. ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागलीय, तिथे राजन साळवी कसा राहील. परवा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार दिला, किती जळफळाट होणार तुमचा, माझी लाइन कापण्यापेक्षा तुमची लाइन वाढवा, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय.
भगवामय कोकण झालाच पाहिजे- शिंदे : एकनाथ शिंदे जहाँ खडा होता है, वही से लाइन सुरू होती है. उद्यापासून तुम्हाला आम्हाला जशा पदव्या दिल्या, तशा तुम्हाला पण देतील, असं म्हणत एक डायलॉग आहे की, आधें इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ, पण मागे वळून बघितलं कोणीच नाही, असा टोलाही शिंदेंनी लगावलाय. भगवामय कोकण झाला पाहिजे, कारण बाळासाहेबांचं प्रेम कोकणावर होतं. मैं अकेला चलता गया, पीछे लोग आते गये कारवा बनाता गया. ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांना समजलं नाही, त्यांनी आता ओळखलं असेल. कोकणात समृद्धी आणायची आहे. आपण प्रकल्प बनवायचे आहेत. मी मनापासून राजन साळवी यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हापासून वाटत होतं राजन साळवी सोबत हवा होता, पण तेव्हा काही हुकलं, चुकलं. राज्यात शिवसेना सगळीकडे पाहिजे. कार्यालयात अन् घरी बसून फेसबुक लाइव्ह करून कामं होत नाहीत. सगळ्या मंत्र्यांना मी सांगितलं आहे फील्डवर जा. तसेच लाडकी बहीण योजना आणि कोणतीही योजना बंद होणार नसल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.
कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात : विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election) पराभवानंतर नाराज असलेले राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु त्यांनी शिवसेनेची कास धरण्याचा निर्णय घेतला. राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश हा कोकणात शिवसेनेला (उबाठा) हा मोठा धक्का मानला जात असून, यामुळं कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागलीय.
2019 मध्ये सलग तिसऱ्यांदा शिवसेनेकडून आमदार : 1993-94 च्या सुमारास राजन साळवी हे शिवसेनेत (उबाठा) सक्रिय झाले. इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे (उबाठा) नगराध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदं भूषवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेनेचे (उबाठा) तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या सहकार्यानं त्यांनी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख पदही (1995-2004) मिळवलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र, 2009 मध्ये याच मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये सलग तिसऱ्यांदा ते शिवसेना (उबाठा) पक्षातून आमदार झाले. शिवसेनेत फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचं (उबाठा) उपनेता केलं होतं. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
हेही वाचा -