शिर्डी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी देखील अद्याप महायुती सरकारचा शपथविधी होताना दिसत नाही. राज्यात महायुती सरकारला घवघवीत यश मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. विधानसभेच्या निकालानंतर आम्ही लगेचच सरकार स्थापन करु, असं महायुतीतील नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होत नसल्यामुळं शपथविधीला विलंब होत असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते राहुल नार्वेकर यांनी शिर्डीत प्रतिक्रिया दिली.
पाच डिसेंबरपर्यंत सरकार स्थापन होईल : साई दर्शनानंतर राहुल नार्वेकर म्हणाले की, "2004 मध्ये आघाडीला पूर्ण बहुमत असूनही सरकार स्थापन करण्यास किती दिवस लागले होते. दोन, चार दिवसांनी फार काही फरक पडणार नाही. मात्र, पाच डिसेंबरपर्यंत शपथविधी होवून सरकार स्थापन होईल."
नार्वेकरांची संजय राऊतांवर टीका : भाजपा डंक मारणारा विषारी नाग असल्याची टीका संजय राऊतांनी केल्यानंतर नार्वेकर यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला. "शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील साप कोण आहे?, सर्वात जास्त विष कोणी कालवलं? हे जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना माहिती आहे," असं म्हणत नार्वेकरांनी संजय राऊतांना टोला लगावला.
नार्वेकर ऑन जितेंद्र आव्हाड : हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावर नार्वेकर म्हणाले की, "हा रडीचा डाव आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे बारामतीतून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी मतपत्रिकेवर मतदान घ्या, मी राजीनामा देते असं का नाही म्हणाल्या."
हेही वाचा -