मुंबई Eknath Shinde : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे. हिंदू समाज हिंसक असल्याचं वक्तव्य त्यांनी लोकसभेत केलं. त्यामुळं देशातील कोणताही हिंदू राहुल गांधींना माफ करणार नाही, हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा बदला हिंदू समाजाकडून योग्य वेळी नक्की घेतला जाईल. त्यांना त्यांच्या वक्तव्याचं उत्तर नक्की मिळेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन प्रांगणात पत्रकारांशी बोलताना दिला. राहुल गांधींनी विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हे वक्तव्य केल्याचा आणि हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. हिंदू समाज हा सहिष्णू, संयमी आहे. मात्र, असं वक्तव्य करणं अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षांच्या टीकेकडं आम्ही फारसं लक्ष देत नाही, असं देखील ते म्हणाले.
नागरिकांना मदत करण्याचं सरकारचं काम : आम्ही आमचं काम योग्य पद्धतीनं करतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याचं काम आम्ही केलं आहे. वारकऱ्यांच्या दिंड्यांना निधी दिला जात आहे. मात्र, हे सहन होत नसल्यानं आता विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत. अशा आरोपांकडं आम्ही लक्ष देत नसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. हिंदूंना हिंसक म्हटलं, हिंदूंचा अपमान केला, हा कसला दुटप्पीपणा, असा प्रश्नही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ : या सर्व योजनांसाठी आम्ही पुरेशा निधीची तरतूद केलेली आहे. आम्ही ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळं विरोधकांनी काळजी करण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 15 जुलैपर्यंतची मुदत होती. ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळं महिलांनी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
राहुल गांधींचा दुटप्पीपणा : सांगली जिल्ह्यातील पलूस येथे पोषण आहारात मृत साप आढळल्याप्रकरणी शासन कठोर कारवाई करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असं ते म्हणाले. आधी हिंदूंवर हल्ले करायचे, हिंदूंना हिंसक म्हणायचे आणि नंतर वारीमध्ये सहभागी व्हायचं हा राहुल गांधींचा दुटप्पीपणा आहे. मात्र आता देशातील हिंदू जागे झाले असून अपमान सहन करणार नाहीत, असं शिंदे म्हणाले.
वर्षाला 18 हजार रुपये मिळणार : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारे तीन सिलेंडर देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचा लाभ महिलांना मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे. यामध्ये कोणी पैशांची मागणी केल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. महिलांना या योजनेचा लाभ घेताना कुठलीही अडचण होऊ नये, याची काळजी घेण्याची निर्देश त्यांनी दिले आहेत. वारकऱ्यांची वारी सुरक्षिततेत होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारतर्फे पुरवण्यात येत आहेत. त्यांना टोलमधून माफी देण्यात आली आहे. वारकऱ्यांची वारी अत्यंत निर्मळ, स्वच्छ, सुरक्षित होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हे वाचलंत का :
- ड्रेसकोड लागू केल्याप्रकरणी आमदार सरनाईकांची मुंबईतील कॉलेजवर कारवाईची मागणी, म्हणाले हा 'तालिबानी फतवा' - mla Pratap Sarnaik
- नवाब भाई आहेत कुठं...? अजित पवारांच्या 'देवगिरी'वर काय घडलं? - Nawab Malik
- हाथरस चेंगराचेंगरीनंतर 'भोलेबाबा' फरार : आत्तापर्यंत 116 भक्तांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Hathras stampede