अहमदनगर Successful Radhakrishna Farmer : राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील राधाकृष्ण गुळवे हे लोणी येथील एका आयटीयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. त्यांना 30 हजार पगार होता. गुळवे यांना प्रवचन ऐकण्याचीही आवड आहे. एके दिवशी कर्करोग कशामुळं होतो? हे ऐकल्यानंतर राधाकृष्ण गुळवेंनी आपणही 'विषमुक्त शेती' करुन इतरांनाही विषमुक्त अन्न दिलं पाहिजे असं ठरवलं. म्हणून त्यांनी नोकरी सोडून विषमुक्त शेती करण्यास सुरूवात केली.
नोकरी सोडून केली विषमुक्त शेती : प्राध्यापकाची नोकरी करत असतानाच राधाकृष्ण गुळवे यांनी आपल्याकडं असलेल्या 10 एकर शेतीतील काही भागात पेरूची लागवड केली. पेरूचं चांगलं उत्पादन मिळालं. मात्र, बाजार भाव चांगला नसल्यानं गुळवे यांनी तो पेरु चांगला पँकींग केला आणि लोणीतील कॉलनीमध्ये विकण्यास सुरुवात केली. एक उच्च शिक्षित शेतकऱ्याची ही धडपड पत्रकार प्रशांत शर्मा यांंनी बातमीतून दाखवली. त्यामुळं गुळवेंच्या प्रयत्नाला यश मिळण्यास सुरूवात झाली. ही बातमी पाहून मुंबई, पुणे, नाशिक, येथून गुळवे यांच्या पेरूला मागणी येवू लागली. मार्केटिंगची कुठलीही चैन नसलेल्या राधाकृष्ण गुळवेंना पेरूमुळं लोक ओळखू लागले. त्यानंतर गुळवेंनी प्राध्यापकाची नोकरी सोडून विषमुक्त शेतीतच स्वताला झोकून दिलं.
कडधान्य आणि फळांची शेती : पेरू, सीताफळ अशा अनेक फळांची शेती आणि कडधान्यही गुळवे यांनी ग्राहकांना द्यायला सुरूवात केली. त्यानंतर विषमुक्त केमिकल विरहीत माल विक्रीची एक चैनच गुळवेंनी सुरु केली. मुंबई, पुण्यातील काही स्टोअर्स आणि अनेक चोखंदळ ग्राहकांपर्यंत ते माल पोहोचवतात. ग्राहकांना दर्जेदार आणि विषमुक्त खायला मिळेल, यासाठी त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संपर्क केला. त्यांच्याही शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली.
लाकडी घाण्याचं तेल थेट मुंबईला पुरवतात : विषमुक्त पध्दतीनं पिकवलेल्या कडधान्य, लाकडी घाण्याचं तेल थेट ग्राहकांच्या मागणीनुसार दर रविवारी मुंबईला पुरवलं जाते. शेतकऱ्यांकडून गुळवे विविध प्रकारचं कडधान्य खरेदी करतात. त्यांना मार्केटपेक्षा दोन रुपये जास्तीचे देतात. चांगल्या धान्याबरोबर गावरान चवही चाखायला देतात.
मुंबईकरांना गावठी जेवणाचा आस्वाद : पतीनं प्राध्यापकाची 30 हजार रूपये पगाराची नोकरी सोडून 'विषमुक्त शेती' करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, हळूहळू सगळं ठीक झालं. पती राधाकृष्ण गुळवे यांनी मुंबई येथील पवईत कडधान्याचे स्टॉल लावण्यास सुरूवात केली. मागणी वाढल्यानं गुळवे परिवारातील सर्व सदस्यांनी त्या मालाचं पॅकींग करण्यास मदत केली. त्यानंतर असेच काही दिवस त्यांना बचतगट चालवत असलेल्या आपल्या पत्नीस मुंबईला चल म्हटलं. मात्र, कारभारीन पण हुशार, मी केवळ मुंबई पहाण्यासाठी नाही तर, आपल्या गावठी जेवणाचा आस्वाद मुंबईकरांना देण्यासाठी येते, या अटीवर त्यांनी मुंबई गाठली. मंजुश्री यांनी अख्खं किचनच बरोबर घेतलं आणि हिरानंदानी गार्डन गाठलं तिथं थालीपीठ, पुरण पोळी, बाजार आमटी, मासवडी, बाजरी भाकर खव्वयांना देण्यास सुरुवात केली.
एका दिवसाला 15 हजार रुपयांची कमाई : राधाकृष्ण गुळवे यांनी ग्रामीण खाद्य पदार्थांचा व्यवसायच सुरु केला. सुरूवातीला त्यांना कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यातील दर रविवारी सकाळी गावरान खाद्य पदार्थांचा स्टॉल मंजुश्री गुळवे सुरु करतात. एका दिवसात साधारणता 10 ते 15 हजार रुपयाची कमाई त्यांना होत असल्याचं मंजुश्री गुळवे यांनी सांगितलं.
"ग्रामीण भागात शिक्षकाच्या नोकरीला खूप प्राधान्य असतं. माझं लग्न झालं त्यावेळी मला शिक्षक नवरा आहे म्हणून दिलं होतं. मात्र येणाऱ्या पगारात घरखर्च, मुलांचं शिक्षण या खर्चात पगार संपून जात होता. मला पतीकडं पैसे मागावे लागत होते. मात्र, आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. आज आम्ही पती-पत्नी महिन्याकाठी 2 ते 3 लाख रुपये कमवतो. माझे पती तीस हजारानं दुसऱ्यानकडं नोकरी करत होते, ते आज महिन्याला 50 ते 60 हजाराचा पगार इतरांना देतात. मीही एक यशस्वी महिला झाल्याचं समाधान आहे." - मंजुश्री गुळवे, शेतकरी
इतर शेतकऱ्यांसाठी गुळवे पॅटर्न : ग्रामीण भागात उत्तम शेती करणारे आज अनेक शेतकरी आहेत. तर त्यांच्या पत्नी सुगरणी आहेत मात्र, आपल्या शेतात पिकवायचं आणि दोन पैश्यासाठी गरज पडली की, विकायचं हे केलं जाते. मात्र, आपल्या मालाचं आपणच ब्रँडींग करायचं आणि आपल्या बरोबरीनेच इतरही शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळवून देण्याचा हा गुळवे पॅटर्न नक्कीच इतरही शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरु शकेल.
हेही वाचा -
- आयटीचा जॉब सोडून तरुण वळला शेतीकडं; पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या शेतीतून कमवतोय लाखो रुपये - White Jamun Farming
- गोवऱ्या विक्रीतून अमोल खुळे कमवतोय बक्कळ पैसा, बँकेच्या जनरल मॅनेजरची नोकरी सोडून उभारला उद्योग - Business Success Story
- वाशिम येथे अभिनव उपक्रम, सिट्रोनेला गवतापासून शेतकरी कमवतोय भरघोस नफा