मुंबई : Shinde Group Seats Allocation : लोकसभा निवडणुकीतील 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र अजूनही महायुतीत जागा वाटपावरून अंतिम यादी आणि अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीत अजूनही काही जागांचा तिढा कायम आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेना (शिंदे गटाला) मिळाल्यानंतर ठाणे, नाशिक आणि दक्षिण मुंबई या जागेचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, आम्ही एकूण 16 जागांवर ठाम आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच ८ त्यानंतर १ जागा मिळाल्यानंतर पुन्हा ७ जागा मिळविण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरतील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
16 जागा मिळतील असा विश्वास - वैजनाथ वाघमारे : मुख्यमंत्र्यांनी 16 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. ज्या शिवसेनेच्या पारंपारिक आणि हक्काच्या जागा आहेत त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे आणि मिळतील त्यामध्ये अजिबात शंका नाही. महायुतीत तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते समन्वयाने चालत आहेत, असं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. तसेच ठाणे आणि नाशिक या शिवसेनेच्या वाट्याच्या जागा देखील आम्हालाच मिळतील असेही वैजनाथ वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे. सध्या महायुतीत ज्या जागांचा तिढा कायम आहे, तो तिढा लवकरच सुटेल आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या सोळा जागांचा दावा केला आहे त्या जागाही अपेक्षेप्रमाणे आम्हाला मिळतील असा विश्वासही वैजनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्याची जागा आम्हाला द्या - भाजपा : महायुतीत अद्यापपर्यंत नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई आधी जागांचा प्रश्न सुटला नाही. महायुतीत सात जागांवर एकमत होत नाही आहे. तसेच या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे वरील जागांचा तिढा कधी सुटणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मात्र ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु ठाण्याच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. ठाण्याची जागा आम्हाला द्या आणि नाशिकची जागा तुम्ही घ्या अशी मागणी भाजपाने केली आहे, असा प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला आहे; पण या दोन्ही जागा आमच्या हक्काच्या शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळे ह्या जागा आम्हालाच मिळतील. असं शिवसेना शिंदे गटातील नेते ठामपणे सांगत आहेत. मात्र या जागा कोणाच्या वाटेला जाणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
सर्वेक्षण चाचपणी या निकषावरच उमेदवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण 16 जागांवर ठाम आहोत असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना एकूण 16 जागा मिळतील का? असा प्रश्न भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांना विचारला असता, शिवसेनेकडून पहिल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची जागाही शिवसेनेला मिळाली आहे. अशा एकूण नऊ जागा शिवसेनेला देण्यात आल्यात आणि आता 16 जागांवर ठाम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. परंतु, महायुतीत ज्या ठिकाणी ज्या पक्षाची शक्ती, ताकद असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला तिथे उमेदवारी देण्यात आली आहे. हा महायुतीचा निकष आहे. अजून कुणाला किती जागा द्यायच्या याबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चेतून तोडगा काढतील. अधिक जागा मिळाल्या पाहिजेत हे प्रत्येकाला वाटत असतं; परंतु त्या ठिकाणी पक्षाचे काम आणि आम्ही केलेले सर्वेक्षण, चाचपणी या निकषावरच तिथला उमेदवारी देण्यात येईल असं भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा :
- सलमान खाननंतर आता जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन; बिष्णोई गँगचा हात? - Jitendra Awhad Threat Call
- सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे 'व्हू ईज धंगेकर' लोकसभेत काय करणार? 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत - Ravindra Dhangekar Interview
- "...म्हणून तुम्ही तुरुंगाच्या भीतीनं पळाला", एकनाथ शिंदेंच्या आरोपावर काय म्हणाले विरोधक? - Eknath Shinde allegation