पुणे Swapnil Kusale News : कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्निल कुसाळे यांनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक मिळालं. तसंच वैयक्तिक पदक मिळवणारा तो महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरलाय. पॅरिस येथून स्वप्निल गुरुवारी (8 ऑगस्ट) भारतात परत आला असून, पुणे विमानतळावर स्वप्निलचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर स्वप्निलनं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली. त्यानंतर पत्रकार भवन येथे झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यानं आपलं मत व्यक्त केलं.
स्वप्निल कुसाळे काय म्हणाला? : यावेळी बोलत असताना स्वप्निल कुसाळे म्हणाला की, "महाराष्ट्राच्या मातीत चांगले खेळाडू घडतात. मला ऑलिम्पिकमध्ये जे मेडल मिळालंय ते माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे. माझं स्वप्न इथंच पूर्ण झालेलं नाही. मला देशासाठी गोल्ड मेडल मिळवण्यासाठी अजून मेहनत घ्यायचीय आणि अजून खेळायचंय. तसंच मी स्वतः च स्वतः चा हिरो आहे", असंही स्वप्निल म्हणाला.
कोल्हापुरात जाण्याची इच्छा : पुढं त्यानं सांगितलं की, "क्रीडाप्रबोधिनी नाशिकमधून माझी शूटिंगची सुरुवात झाली. आज सरकार अनेक ठिकाणी खेळाडूंसाठी काम करतंय, याचा आनंद होतोय." मला कोल्हापूरला जाण्याची उत्सुकता आहे. अनेक दिवस झाले मी घरी गेलेलो नाही. कोल्हापूरला गेल्यानंतर सर्वप्रथम देवीचं दर्शन घेईन, असंही स्वप्निलनं यावेळी सांगितलं. तसंच मी माझ्या ड्रीमसाठी खेळतोय. आत्ता मी कमी पडलोय, मात्र भविष्यात गोल्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करेन. पॅरिस येथील ऑलिम्पिकमध्ये खूप काही शिकायला मिळालं, असंही तो म्हणाला.
हेही वाचा -
- ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळेची पुण्यात विजयी मिरवणूक; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक - Swapnil Kusale
- 'बाप्पा'मुळंच सगळं शक्य झालं; ऑलिम्पिकपदक विजेता स्वप्निल कुसाळे 'दगडुशेठ' चरणी लीन - Swapnil Kusale
- "स्वप्निलच्या यशानंतर राज्य सरकार 'मिशन लक्ष्यवेध'ला देणार बळ"- क्रीडामंत्री संजय बनसोड - Sanjay Bansode On Paris Olympics