पुणे Pune Aundh Firing : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोन्हा यानं फेसबुक लाईव्ह करत गोळीबार करुन हत्या केली आणि मग स्वतःला गोळीबार करुन आत्महत्या केली. हे प्रकरण ताजं असताना अशीच काहीशी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सराफा व्यावसायिकानं दुकान मालकावर गोळीबार करुन आत्महत्या केली आहे. अनिल सखाराम ढमाले असं गोळीबार करुन आत्महत्या करणाऱ्या गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर आकाश गजानन जाधव असं या गोळीबारात जखमी झालेल्या दुकान मालकाचं नाव आहे.
औंध परिसरात पैशांच्या वादातून गोळीबार : पुण्यातील औंध परिसरात पैशांच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अनिल सखाराम ढमाले यानं आकाश गजानन जाधव यांच्यावर गोळीबार करुन स्वतःवर देखील गोळी मारुन घेतली आहे. ज्युपीटर रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली आहे. गोळीबार करणारा अनिल ढमाले यानं पैशाच्या वादातून हा गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अनिल ढमालेनं रिक्षातच केली आत्महत्या : गोळीबार केल्यानंतर अनिल सखाराम ढमाले हा रिक्षातून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याकडं निघाला होता. त्यानं आकाश गजानन जाधव यांच्यावर पैशांच्या वादातून गोळीबार केला. मात्र वाटेत त्यानं स्वतः वर गोळीबार करून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
चिठ्ठीत नमूद केलं गोळीबाराचं कारण : आकाश गजानन जाधव यांचं बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. आकाश गजानन जाधव यांनी अनिल सखाराम ढमाले याला 14 वर्षांपासून दुकान भाड्यानं दिलं आहे. अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान अनिल सखाराम ढमाले चालवत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. तीन महिन्यापासून अनिल सखाराम ढमाले याला आकाश जाधव आर्थिक कारणावरुन त्रास देत होता. "आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत आहे," असं अनिल सखाराम ढमाले यानं लिहिलेल्या चिठ्ठीत आढळलं आहे.
हेही वाचा :