बारामती (पुणे)- वीज कंपनीच्या 33 वर्षीय ग्राहकानं जास्त वीजबिल आल्याचा दावा करत महावितरण कंपनीच्या महिला टेक्नीशियनची कार्यालयात हत्या केली. अभिजीत पोटे असे आरोपीचे नाव आहे. तर रिंकू बनसोडे (२६) असे मृत महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्या बारामती तालुक्यात मोरगाव येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यरत होत्या.
५७० रुपये वीजबिल आल्यानं संतप्त झालेल्या वीज ग्राहकानं महावितरण कंपनीच्या कार्यालयात घुसून महिला कर्मचारी रिंकू बनसोडे यांची हत्या केली. विशेष म्हणजे, महिला कर्मचारी या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर बुधवारी रुजू झाल्या होत्या. नेहमीप्रमाणे रिंकू बनसोडे या बुधवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास एकट्याच कार्यालयात होत्या. आरोपी अभिजीत पोटेने रिंकू यांना जास्त वीजबिल का आले, असा जाब विचारला. त्यानंतर एकामागोमाग एक असे कोयत्यानं जवळपास १६ वार रिंकू यांच्या हाता-पायावर आणि तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
बनसोडे या मूळच्या लातूर शहरातील रहिवासी- सुपा पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार जखमी झालेली महिला मोरगाव येथे रुग्णालयात दाखल झाली. तिथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीनं पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु गंभीर जखमांमुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनसोडे या मूळच्या लातूर शहरातील रहिवासी आहेत. त्या दहा वर्षांपूर्वी 29 ऑगस्ट 2013 रोजी महावितरणच्या सेवेत त्या दाखल झाल्या होत्या. गेल्या दहा वर्षांपासून त्या बारामतीतील मोरगाव येथेच कार्यरत होत्या. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे.
आमचा गुन्हा काय ?- "आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावानं आहे. मागील १२ महिन्याचा वापर तपासला असता आरोपीचा वापर ४० ते ७० युनीटमध्ये आहे. वीजबिलाची थकबाकी नव्हती. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे वापर ३० युनीटनं वाढून बिल ५७० आले होते. हे बील वापरानुसार आणि नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच ग्राहकाची वीज बिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे आम्ही कार्यालयात काम करत सेवा देतो. आम्ही सतत २४ तास वीज पुरवठा करतो. मग आमचा गुन्हा काय", असा सवाल महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यानं केला.
हेही वाचा-