पुणे IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानंतर ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलीस कायदेशीर बाबी तपासत असून या प्रकरणात पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावल्याची माहिती समोर आली.
काय लिहिलं निवेदनात? : गुरुवारी 18 जून 2024 रोजी महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना व नायब तहसीलदार - संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं. त्यात सर्व संघटना, महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगण्यात आलं. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील प्रशिक्षण कालावधीमध्ये अत्यंत उद्दामपणाचं वर्तन केलं असून ते कोणत्याही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यास शोभणारं नाही. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यास केबिन, गाडी, निवास, स्वतंत्र शिपाई अशा कोणत्याही सुविधा पुरविणेबाबतची तरतुद नाही. तरीही त्यांनी त्याचा सातत्यानं आग्रह धरुन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी परस्पर संपर्क साधून त्यांना दम देऊन जबरदस्तीनं अशा सुविधा प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या वडीलांनी देखील तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यास दम देऊन खेडकर यांच्यासाठी स्वतंत्र केबिन तयार करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला.
आंदोलन करण्याचा इशारा : "तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर घाणेरडे आरोप करुन एकूणच जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याची बाब खपवून घेतली जाणार नाही. याबाबतीत आम्ही सर्वजण पुणे जिल्हाधिकारी यांच्या पाठीशी आहोत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे अत्यंत चांगले अधिकारी असून त्यांना आम्ही 25 ते 26 वर्षांपासून ओळखत आहोत. आजपर्यंत त्यांनी कधीही कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी कसल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही. तसंच त्यांनी गैरवर्तन केल्याबाबत आजपर्यंत कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तरी पुणे जिल्हाधिकारी यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या व अनेक बाबींमध्ये दोषी आढळून येणाऱ्या पूजा खेडकर व त्यांच्या वडीलांवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल," असा इशारा या निवेदनात देण्यात आला.
हेही वाचा :