पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारल्यानंतर देशभर बिश्नोई गँगची चर्चा (Bishnoi Gang) जोरदार सुरू झाली. अशातच पुण्यातील एका नामांकित सराफा व्यावसायिकाला बिश्नोई गॅंगकडून धमकीचा ईमेल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
परदेशातून आला मेल : बिश्नोई गॅंगच्या नावानं हा ईमेल आल्यानं पुण्यातील हा सराफा व्यावसायिक चांगलाच घाबरला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल परदेशातून आला असल्याचं समजतंय. या ईमेलच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेवर आता पोलिसांकडून गुप्तता बाळगत युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आलाय.
सराफा व्यावसायिकाला धमकीचा आला ईमेल : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगनं या सर्व हत्येची जबाबदारी घेतली होती, अशी एक कथित पोस्ट सोशल मीडियावर शेयर करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एका बड्या सराफा व्यावसायिकाला बिश्नोई गँगच्या नावानं ईमेल आल्यानं पुन्हा पुण्यात जोरदार चर्चा सुरू झाली. तसंच पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर येऊन काम करत आहे.
- बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं एकूण 9 जणांना अटक केली होती. या घटनेतील आरोपी हे फोनवरून बिश्नोई गँगशी जोडले गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या आधीही बिश्नोई गँगच्या नावानं अभिनेता सलमान खानला अनेकवेळा धमकी देण्यात आली होती.
हेही वाचा -