पुणे Controversy In BJP Over Ajit Pawar : लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता तर थेट अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी थेट भूमिका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी आढावा बैठकीमध्ये अजित पवार यांच्याबाबत खदखद बोलून दाखवली.
भाजपा कार्यकर्ते अजित पवारांवर नाराज? : सुदर्शन चौधरी म्हणाले की, "अजित पवार आमच्या बोकांडी दिले आहेत. ते सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आज भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे की, अजित पवार यांना सत्तेत घेतल्यानं भाजपाचा कार्यकर्ता हा दाबला गेला. पुणे जिल्ह्यात अजित पवार आल्यानं कुठलाही कार्यकर्ता हा खुश नाही. गेली दहा वर्षे भाजपा मोठी व्हावी म्हणून आम्ही राष्ट्रवादीशी संघर्ष करत होतो. आज अजित पवार हे सोबत असल्याने सर्वच कार्यकर्ते हे संघर्ष करत आहेत आणि याच भावना आम्ही मांडल्या आहेत."
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांकडून कानउघाडणी : यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले की, "कोण आहे सुदर्शन चौधरी? त्यांना बोलण्याचा कोणी अधिकार दिला? हा काय भाजपाचा प्रवक्ता आहे का? मी तर यांचं नाव देखील ऐकलेलं नाही. अजित पवार हे महायुतीत राहावं ही देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. लोकसभेच्या आम्हालाच 4 जागा दिल्यावर आम्ही कसे पराभवाला कारणीभूत होऊ शकतो? उलट आमच्या पक्षाची ताकद ही राज्यभर मिळाली आहे. शिरूरमध्ये आमदार राहुल कुल हे निरीक्षक होते. तर मग त्यांनी अश्या कार्यकर्त्यांचे जागीच कान उघडले पाहिजे. शिरूरमध्ये भाजपाने काम केलं असतं तर आढळराव हे जिंकून आले असते."
आता भाजपा-राष्ट्रवादीत संघर्ष : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीत नको, अशी चर्चा सुरू असताना आता भाजपाचे पदाधिकारी हे थेट अजित पवार हे महायुतीत नकोय असं बोलायला लागले आहेत. यामुळे आता अजित पवार यांच्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
- व्होटबँक म्हणून वापर करण्याऐवजी काँग्रेसनं अमरावतीत मुस्लिम उमेदवार द्यावा; भाजपाची मागणी - Amravati Assembly Constituency
- आधी शेतकरी कर्जमाफी करा नंतरच निवडणुकीला सामोरं जा, उद्धव ठाकरेंचं महायुती सरकारला आव्हान - Uddhav Thackeray PC
- धानाच्या धर्तीवर सोयाबीनसह कापसाला अनुदान द्या; शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं मंजूर करा, भाजपा नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी - BJP Leaders On Farmers Issues