पुणे:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या दृष्टीने नाकाबंदी केली असता पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रुपयांची रोख रक्कम पकडलीय. MH-45-AS-2526 नंबरची गाडी जप्त करण्यात आली असून, ती गाडी सांगोल्यातील अमोल नलावडे व्यक्तीचा नावे आहे. विशेष म्हणजे ही रक्कम नेमकी कुठे नेली जात होती अन् कशासाठी त्याचा वापर होणार होता, यासंदर्भात तपास सुरूच आहे.
अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण: खरं तर काल रात्री पोलिसांनी कारवाई गाडीतून पाच कोटींची रक्कम जप्त केली, पण ज्यांच्याकडे रक्कम होती, त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. वाहन जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं. मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 5 कोटी रुपयांची रक्कम कुठून आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रुपये कोणाचे आहेत, याची माहिती देण्यास पोलीस, प्रांताधिकारी, निवडणूक विभागाचे अधिकारी आणि इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी तयार नव्हते. या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक राजेश गवळी, प्रांताधिकारी यशवंत माने आणि निवडणूक अधिकारी यापैकी एकानंही उत्तर दिलेलं नाही.
एका गाडीत 5 कोटींची रोकड: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केलीय. अशातच काल रात्री राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत 5 कोटींची रोकड आढळून आली. आता यावर शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची ही गाडी असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र पोलिसांपासून ते निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत जो तपास सुरू केला जातोय, त्याबाबत अजूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या गाडीतील रक्कम नेमके कोणाची होती आणि कोणत्या मतदारसंघासाठी नेण्यात येत होती, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हेही वाचाः
कारमधून पोलिसांनी जप्त केले 5 कोटी; संजय राऊत म्हणाले 'काय बापू काय झाडी काय डोंगर'