छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला जनाधार पाहता विरोधकांनी ईव्हीएम मशीनमध्ये दोष असल्याचा आरोप केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकर चळवळीकडून प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळून निषेध व्यक्त केला गेला. क्रांतीचौक भागात जोरदार घोषणाबाजी करत ईव्हीम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. तर जागृत नागरी कृती समितीद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकशाही घट्ट राहण्यासाठी ईव्हीएम मशिनला विरोध करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
ईव्हीएम मशीनची प्रतीकात्मक होळी : विधानसभा निवडणुकीत निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे मतदान प्रक्रिया आणि मतदानामध्ये ईव्हीएम मशीनच्या वापरावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर शहरातील आंबेडकर चळवळीनं क्रांतीचौक भागात आंदोलन केलं. यावेळी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळून भाजपा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरून मतदान मिळालं असताना चार महिन्यात असं काय झालं, की जनाधार बदलला. त्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत आंदोलन करण्यात आलं. लवकरच देशभरात मोठी चळवळ उभी करणार," असा इशारा आंबेडकरी चळवळ समन्वयक विजय वाहुळ यांनी सांगितलं.
मोर्चा काढून दिलं निवेदन : क्रांतीचौक भागात एकीकडे प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची होळी करत असताना, त्याच ठिकाणी जागृत नागरी कृती समितीनं ईव्हीएम मशीन विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून आरएसएस आणि भाजपानं मतांमध्ये हेराफेरी करत सरकार आणलं. जनतेनं नाही, तर मशिनद्वारे हे सरकार आणलं गेलं. मुख्य निवडणूक आयोगानं देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. मतांचा अधिकार अबाधित राहावा, संविधान विरोधी शक्तीला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात फलक घेऊन भाजपा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ही सुरुवात असून लवकरच आंदोलनाला मोठं स्वरूप प्राप्त करून देऊ," असं संविधान अभ्यासक आणि जागृत नागरी कृती समितीचे समन्वयक अनंत कावरे यांनी सांगितलं.
हेही वाचा