मुंबई Pooja Khedkar Tried To Pressure DCP : वादग्रस्त परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. चोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी पूजा खेडकर यांनी पोलीस उपायुक्तांवर दबाव टाकल्याचं उघड झालं. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी राज्य सरकारकडं अहवाल पाठवला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर पुन्हा वादात सापडल्या आहेत.
आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस उपायुक्तांवर दबाव : पनवेल पोलीस ठाण्याच्या परिसरात 18 मे रोजी चोरीच्या गुन्ह्यात ईश्वर उत्तरवाडे या आरोपीला पोलिसांनी पकडलं होतं. या गुन्ह्यात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी फोन करुन त्या आरोपीला सोडण्यासाठी दबाव टाकला. ईश्वर उत्तरवाडे याचा चोरीचा गुन्हा किरकोळ आहे. त्यामुळे त्याला सोडून देण्यात यावं, यासाठी पूजा खेडकर यांनी दबाव टाकला. मात्र पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी चोरीतील गुन्ह्यातील आरोपीला सोडण्यास नकार दिला.
पोलीस उपायुक्तांना दिली आयएएस अधिकारी पदाची ओळख : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त विवेक पानसरे यांना परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आपली ओळख करुन दिली. मात्र कॉलर खरोखरचं आयएएस अधिकारी आहे, का याची खात्री पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना नव्हती. त्यामुळे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी ईस्वर उत्तरवाडे या आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी न्यायालयाकडं केली. पूजा खेडकर यांनी केलेल्या कॉलला पोलिसांनी महत्व न देता आरोपीला कोठडी मागतिली. त्यामुळे आरोपी ईश्वर उत्तरवाडे हा अद्यापीह न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली.
नवी मुंबई पोलिसांनी पाठवला अहवाल : पूजा खेडकर यांनी स्वतंत्र केबिन आणि गाडीवर दिवा लावल्यानं मोठा वाद झाला. त्यामुळे पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली. त्यामुळे पूजा खेडकर या प्रकाशझोतात आल्या. मात्र नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकर यांनी केलेल्या कथित कॉलबाबत गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार अहवाल पाठवला. हा अहवाल त्यांनी गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या सचिव सुजाता सौनिक यांच्याकडं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यामार्फत पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या दोन पानाच्या अहवालावर गृह विभाग काय कारवाई करते, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
हेही वाचा :
- पूजा खेडकर यांच्या आईनं घातला पोलिसांसोबत वाद; 'ऑडी'वर तब्बल 'इतका' फाईन, पाठवली नोटीस - Controversial IAS Pooja Khedkar
- पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांची केंद्रीय समिती करणार चौकशी, राज्यातील नेते काय म्हणतात? - Pooja Khedkar Case
- आयएएस पूजा खेडकरांच्या आईची पिस्तूल घेऊन दमदाटी, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही! - IAS Pooja Khedkar