शिर्डी (अहमदनगर)- "राजकारणात मोठे बदल झाले आहेत. आता दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वीच्या राजकारणात एकमेकांबद्दल आदर आणि सन्मान होता. मात्र, अलीकडच्या राजकारण हे दिसून येत नाही. प्रथम देश आणि त्यानंतर पक्ष अशी सकारात्मक भूमिका राजकीय नेत्यांची असणं महत्वाचं आहे," अशी रोखठोक प्रतिक्रिया प्रिया दत्त (Priya Dutt ) यांनी साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केलीय.
माजी खासदार प्रिया दत्त यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना प्रिया दत्त यांचे डोळे पाणावले. यावर बोलताना प्रिया दत्त यांनी म्हटलं, "माझी आई (अभिनेत्री नर्गीस दत्त) साईबाबांची परमभक्त होती. ती आजारी असतानाही शिर्डीला येत असे. आज शिर्डीत येवून साईंचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आम्ही जीवनात अनेक चढ-उतार बघितले. मात्र, आपल्यात ती ताकद हवी. साईंचा आशीर्वाद असला तर नक्कीच चांगलं होतं. साईंकडे मी तेच मागितलं आहे."
अभिनेता संजय दत्तबरोबर दोन्ही बहिणी येणार दर्शनाला- "साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर मी प्रत्येकवेळी काहीच मागत नाही. जीवनात अनेक चढ-उतार येतात. या अडचणींचा सामना करण्याची शक्ती साईबाबांकडून मिळावी, एवढीच प्रार्थना साईचरणी केली आहे," असं प्रिया दत्त यांनी म्हटलंय. पुढे प्रिया यांनी, आपण साईबाबांचं दर्शन घेवून मंदिराबाहेर आल्यानंतर भाऊ संजय दत्त आणि आम्ही दोघी बहिणींनी एकत्रित साईंच्या दर्शनासाठी यावं असा विचार मनात आल्याचं सांगितलं. साईबाबांचं बोलवणं आलं तर लवकरच आम्ही तिघे भाऊ-बहीण एकत्र साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
''नवीन वर्षा निमित्तानं आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आलाय. मी नेहमी येत असते. मात्र, आता जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला महिना असल्यानं साईबाबांचे दर्शन घेवून आनंद वाटला आहे"-प्रिया दत्त, माजी खासदार
- साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानच्या वतीनं प्रिया दत्त यांचा शाल आणि साईमूर्ती देवून सत्कार करण्यात आलाय. प्रिया दत्त या मंदिरातील व्हीआयपी गेट क्रमांक दोन नंबरमधून येत असताना काही दिव्यांग भाविक व्हीलचेअरवरून मंदिरात येत होते. तेव्हा दत्त यांनी त्यांना जागा देत काही काळ प्रतीक्षा केल्याचं दिसून आले.
हेही वाचा-