मुंबई Postponed election of teachers - केंद्रीय निवडणूक आयोगानं अखेर महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढे ढकलली आहे. अनेक शिक्षक लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. ते निवडणुकीनंतर सुट्टीवर जाणार असल्यानं या निवडणुकीला शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.
लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे विरजण पडलं होतं. अखेर निवडणूक आयोगानं जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती, तर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. आयोगाने याबाबतचं प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.
शिक्षक भारतीचा विजय - 10 जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे हजारो शिक्षक मतदानापासून वंचित राहणार होते. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षकांचा मताधिकार सुरक्षित केल्याबद्दल सुभाष किसन मोरे यांचं आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अभिनंदन केलं.
सुट्टीनंतर निवडणूका - महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जून पर्यंत सुट्टी कालावधी जाहीर केला असून शाळा 15 जून नंतर सुरू होणार आहेत. तसंच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसंच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. या सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्यावतीने निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला होता. त्याला यश मिळाल्याचं अशोक बेलसरे यांनी सांगितलं.
हेही वाचा..
- राज्यात निवडणूक प्रचारात जुमलेबाजीची 'दीवार' - Lok Sabha Election 2024
- मतदानासाठी 'त्यांनी' चक्क दुबईतून गाठलं संभाजीनगर, मतदान न करणाऱ्यांनी घ्यावा आदर्श - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सोनिया गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला; नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024