मुंबई Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील भाजपाचे जेष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू असून जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेनं चांगला जोर धरला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानं भाजपा त्यांची पक्षाच्या जबाबदारीतून मुक्तता करणार आहे. शिवाय त्यांचा कार्यकाल यापूर्वीच संपला, परंतु तो वाढवण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यास या पदापर्यंत पोहोचणारे महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्यानंतरचे ते दुसरे नेते असतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असेल, तर आनंदच आहे. माणसानं एक एक पायरी वर चढली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण आहेत. केंद्रीय नेतृत्वानं असा जर विचार केला असेल, तर तो आमच्यासाठी आनंदाचा आहे. चंद्रकांत पाटील - माजी प्रदेशाध्यक्ष भाजपा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट : लोकसभा निवडणूक 2024 नंतर भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हा प्रश्न यापूर्वीपासून उपस्थित झाला आहे. जे पी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल निवडणुकीपूर्वीच संपला, मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आता केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर जे पी नड्डा यांची केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे. अशामध्ये भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? याबाबत शोध सुरू झाला. यासाठी अनेक नावं चर्चेत होती. भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, सुनील बंसल, देवेंद्र फडणवीस या नावांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे खरे उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. परंतु एकंदरीत सारासार विचार करून त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर का होऊ शकते शिक्कामोर्तब ? : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. त्याचबरोबर सरकारमधून बाहेर पडत संघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. परंतु भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्यावर विश्वास टाकत महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील, हे ठामपणे सांगितलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. देवेंद्र फडवणीस हे भाजपाच्या अध्यक्षपदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडवणीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यापेक्षाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासून फार चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे फार जवळचे मानले जातात. अशात आरएसएसला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आक्षेप असण्याचं काही कारण नसल्यानं देवेंद्र फडणवीस यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या जनतेत रोष : देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असून ते नागपूरचे आहेत. यापूर्वी नागपूरच्या नितीन गडकरी यांनी भाजपाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद सांभाळलं आहे. सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेत रोष आहे. उद्धव ठाकरे यांची उबाठा सेना आणि स्वतः उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक हाती सामना करायला सज्ज झाले. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचं सर्वोच्च पद सांभाळले तर पक्षाला अनेक बाबींचा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं त्या दृष्टीनं पक्षानं विचार केला आहे. इतकंच नाही, तर पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकींना सामोर जाईल, त्याचा फायदा पक्षाला होईल, अशीही त्यामागची रणनीती आहे.
हा तर आमच्यासाठी आनंदाचा क्षण - चंद्रकांत पाटील : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं, असता ते म्हणाले की, "आनंदच आहे. शेवटी माणसानं एक एक पायरी वर चढली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण आहेत. केंद्रीय नेतृत्वानं असा जर विचार केला असेल, तर ती आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा :
- 'राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा - Uddhav Thackeray targeted Fadnavis
- "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar
- भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार : ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका - BJP criticizes Uddhav Thackeray