नाशिक Police Sports Competition : मुंबई पोलीस स्कॉटलँड पोलिसांच्या बरोबरीनं काम करत असून ही महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाला दिलं. दरम्यान, नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये सुरू असलेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन आज (8 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.
50 कोटींचा निधी देणार : 35 व्या महाराज राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील 19 मैदानांवर सुरू आहेत. या स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत होत्या. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांमध्ये चिकाटी, जिद्द, खेळाडू वृत्ती आहे, म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसंच बालेवाडी पुणे येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणार आहोत. तसंच संभाजीनगर येथे 48 एकर मध्ये क्रीडा विद्यापीठ उभारणार असून त्यासाठी राज्य सरकार 50 कोटींचा निधी देणार आहे", असंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांचे आदिवासी बांबू नृत्य : नानाविज दौंड येथील राज्य राखीव दल पोलीस प्रशिक्षण केंद्रच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आदिवासी बांबू नृत्य सादर केले. आदिवासींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून तसंच जंगलातील प्राण्यांचे वेशभूषा हावभाव करून नृत्य सादर केलं, या नृत्याला मुख्यमंत्र्यांसह उपस्थित नागरिकांनीही दाद दिली.
खेळाडूंची उत्तम सोय : 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांसाठी नाशिकमध्ये राज्यभरातील 3 हजार पोलीस खेळाडू दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंसाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सर्वोत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुरुष खेळाडूंसाठी पंचवटीतील म्हाडाच्या इमारतीत, तर महिला खेळाडूंची महाराष्ट्र पोलीस अकादमीत निवासाची सोय करण्यात आली आहे. तसंच थंडीचे दिवस असल्यानं गरम पाण्यानं अंघोळीचीही सोय केली आहे. शिवाय अकादमीत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
हेही वाचा -