मुंबईः मुंबईतील बहुचर्चित पत्राचाळ पुनर्विकासाच्या प्रकल्पात आता आणखी एक वाद समोर आला असून, म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या 72 व्यावसायिक गाळ्यांना नागरिकांनी विरोध केलाय. या संदर्भात म्हाडावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर रहिवाशांना 25 कोटी रुपये कॉर्पस फंड देण्याचा आश्वासन म्हाडानं दिलंय. गोरेगाव येथील पत्रा चाळीचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे, मात्र आता तो पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. परंतु रहिवासी आणि म्हाडा यांच्यामधील वाद पुन्हा एकदा उफाळून समोर आलाय. पत्राचाळीचा प्रकल्प हा पूर्णपणे पुनर्वसन प्रकल्प असल्याने या प्रकल्पातून कुठल्याही विक्री करणाऱ्या सदनिका अथवा व्यावसायिक गाळ्यांची योजना नाही. मात्र असं असूनसुद्धा म्हाडाचे अधिकारी मनमानी करत 72 व्यावसायिक गाळे पत्राचाळीच्या प्रकल्पातून बांधत आहेत. याला स्थानिक रहिवाशांचा जोरदार विरोध आहे, या विरोधात रहिवाशांनी म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढलाय.
व्यावसायिक गाळ्यांना जोरदार विरोध : पत्रा चाळ प्रकल्पात बांधण्यात येणाऱ्या 72 व्यावसायिक गाळ्यांचं बांधकाम सध्या रहिवाशांनी थांबवलंय. मात्र म्हाडा प्रशासन हे गाळे बांधण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. म्हाडाच्या या भूमिकेविरोधात रहिवासी रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी पुन्हा एकदा म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढलाय. पत्रा चाळीचा रहिवासी आणि म्हाडाच्या मुख्य अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्राचाळीच्या रहिवाशांनी आपल्या मागण्या मांडल्या. 72 गाळे म्हाडा बांधत असून, याबाबत रहिवाशांच्या असलेल्या विरोधावर उपाध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा करून तोडगा काढू, असे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितलंय.
पत्राचाळ रहिवाशांना 25 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड: दरम्यान, पत्राचाळीतील रहिवाशांना म्हाडा प्रशासनाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली असून, रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सोसायटीच्या खात्यात 25 कोटी रुपये कॉर्पस फंड जमा करू, असे आश्वासन बोरीकर यांनी दिलंय. तर प्रकल्पासाठी नियमाप्रमाणे 15 टक्के आरजे प्लॉट राखीव ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. 72 गाळ्यांबाबत आमचा लढा कायम असून आम्ही यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे, न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू, असे पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचे अध्यक्ष राजेश दळवी यांनी सांगितलंय.
हेही वाचाः
ना शिवाजी पार्क, ना आझाद मैदान, दसऱ्याला पॉडकास्टच्या माध्यमातून घुमणार राज ठाकरेंचा 'जय महाराष्ट्र'