पंढरपूर Pandharpur Temple News : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं व जिर्णोद्वाराचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. त्यात श्रीं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याचं संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचं प्रस्तावित आहे. तथापि, गाभाऱ्यातील संवर्धनाचं काम करताना मुर्तीचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना करणं आवश्यक असल्यानं विठ्ठल रुक्मिणी दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आलाय. याबाबत 12 मार्च रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजपासून विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचं काम सुरू आहे. सुरक्षित राहण्याकरिता मूर्तीला बुलेट प्रुफ काच बसवण्यात आलीय.
मंदिर संवर्धनाचं काम सुरु : विठ्ठल मंदिरातील सर्व चांदीकाम काढण्यासाठी 25 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या पर्यवेक्षणाखाली सर्व चांदी काढण्यात आली. मूर्तीच्या संरक्षणार्थ बुलेटप्रूफ काचेचं आवरण बसविण्यात आलंय. गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं. मंदिराचं मुळ रुप कायम ठेवून जतन व संवर्धनाचं काम करण्यात येत आहे. तसंच मंदिरात लावण्यात आलेल्या चांदीचं कामही नव्यानं करण्यात येणार आहे. मंदिरातील सर्व चांदी काढून दुरुस्ती करुन पून्हा बसविण्यात येणार आहे. पुर्वीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार त्यात भर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी समिती नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच या सर्व कामाचं संपूर्ण व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय.
पदस्पर्श दर्शन बंद : गर्भगृहातील कामासाठी 15 मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात असल्यानं भाविकांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांमार्फत होणाऱ्या सर्व पूजा बंद असणार आहेत. तसंच भाविकांना सहज व सुलभ मुखदर्शन घेता यावं, यासाठी आवश्यक उपाययोजना मंदिर समितीमार्फत करण्यात येणार असल्याचं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलंय. श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील काम करताना पदस्पर्श दर्शन बंद असल्यानं मुखदर्शन व्यवस्था सुरू ठेवण्याची वारकरी संघटनांनी मागणी केली. तसंच कमी वेळेत मुखदर्शन मिळेल याबाबत नियोजन करावं, अशी मागणीही वारकरी संघटनेनं केली.
हेही वाचा :