मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळं सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. राजकीय नेत्यांचे राज्यभर प्रचार दौरे सुरू आहेत. तर मुंबईतही प्रचारामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर प्रचारानिमित्त दौरे करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या धावपळीच्या वेळापत्रकात सोमवारी मुंबईतील साकीनाका येथे एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असताना संतोष कटके या तरुणानं त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या तरुणानं मुख्यमंत्र्यांकडे पाहून गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तरुणाला जाब विचारण्यासाठी गाडीतून खाली उतरले. शिंदेंच्या या कृतीनंतर आणि तरुणानं दिलेल्या गद्दार या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
काय घडलं होतं नेमकं? : सोमवारी (11 नोव्हेंबर) रात्री साकीनाका परिसरात संतोष कटके या तरुणानं मुख्यमंत्र्यांना पाहून गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या गाडीची काच खाली होती, त्यामुळं मुख्यमंत्र्यांना गद्दार हा शब्द ऐकायला गेला. यामुळं संतप्त झालेले मुख्यमंत्री संतोष कटके या तरुणाला जाब विचारण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात गेले. संतोष कटके हा तरुण मुख्यमंत्र्यांना बघून खुर्चीवर बसूनच राहिला. या घडलेल्या प्रकारानंतर मंगळवारी या तरुणानं ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे नेते आणि उमेदवार नसीम खान यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे : "घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यावर आम्ही कोणतंही राजकारण करत नाही. परंतु एका तरुणानं जर घोषणाबाजी केली, तर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरून जाब विचारणं अत्यंत चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. महाराष्ट्राला अनेक चांगल्या मुख्यमंत्र्यांची परंपरा लाभली आहे. गाडीतून खाली उतरून जाणं हे मुख्यमंत्रिपदासाठी अशोभनी आहे," अशी टीका नसीम खान यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
हेही वाचा
- "उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करा", भाजपा महिला पदाधिकारी आक्रमक, नेमकं प्रकरण काय?
- उद्योग नगरीत यंदाही सिंधी भाषिकांमध्येच सामना; सिंधी समाजाचा राजकीय वारसा ठरवणारी स्पर्धा, मतांवर परिणाम होणार का?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला 'व्हीव्हीआयपी' पास असूनही प्रतिष्ठित गायकाला 'एन्ट्री' नाकारली, एक चूक पडली महागात