मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. निवडणूक प्रचारात विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. तर दुसरीकडं मतदारांना भुरळ पाडण्यासाठी किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरुपात वस्तूचं किंवा पैशाचं छुप्या पद्धतीनं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. दरम्यान, मुंबईतील वरळी मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी महिलांना भांडी वाटप केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. त्यामुळं त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांची उमेदवारी रद्द व्हावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षानं केली.
तरीही निवडणूक आयोग शांत कसे? : "मिलिंद देवरा यांनी अर्ज दाखल करतेवेळी पैसे देऊन कार्यकर्त्यांना जमवलं होतं. त्याच कार्यकर्त्यांनी कॅमेरासमोर हे कबूल केलं होतं. यावेळी सुद्धा मिलिंद देवरानी आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली होती. यानंतर आता निवडणूक प्रचारात मिलिंद देवरा यांच्या कार्यकर्त्यांनी वरळीतील काही महिलांना मोफत भांडी वाटप केली. भांडी वाटप केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मिलिंद देवरानी भांडे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला," असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. "याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडं सोमवारी तक्रार दिली असून, त्यांची उमेदवारी रद्द व्हावी," अशी मागणी केल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
आयोगाकडून कारवाई होणे अपेक्षित : "हे प्रकरण आम्ही जीएसटी विभागाकडं दिलं असल्याचं निवडणूक अधिकारी सांगत आहेत. उमेदवारी अर्ज बाद होणं याचा जीएसटी विभागाशी संबंध काय? मिलिंद देवरा यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना, ते जीएसटी विभागाचं कारण कशासाठी देत आहेत?" असा सवाल शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलाय. "आम्ही तक्रार देऊनही निवडणूक आयोग काहीच करत नाही. निवडणूक आयोग शांत कसे?" असा सवालही अनिल परब यांनी विचारला. मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.
महिलांना भुलवण्याचं काम : "वरळी मतदारसंघात मिलिंद देवरा हे काही इमारतीत भांडी वाटप करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलंय. काही छोट्या खोक्यातून तर काही मोठ्या खोक्यातून भांडी वाटप होत होते. मोफत वाटप करून महिलांना मतासाठी भुलवण्याचं काम मिलिंद देवरा करत आहेत," असा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद देवरा यांच्यावरती गंभीर आरोप केलेत, आता त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून कसे आणि काय उत्तर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -