येवला (नाशिक) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा सामना रंगताना दिसत आहे. "एखाद्या माणसानं फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात. त्यामुळं अशा धोकेबाजांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे," असं म्हणत येवल्यात शरद पवारांनी छगन भुजबळांवर टीका केली. येवल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. तर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनीच केल्याचा पलटवार छगन भुजबळांनी केला.
ऐतिहासिक सभा : अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर शरद पवार प्रचारसभांच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल करत आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची साथ सोडून अजित पवारांसोबत सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येवला मतदारसंघात उमेदवार देण्यात आला. येवला मतदारसंघात मंगळवारी शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शरद पवारांचा भुजबळांवर हल्लाबोल : सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, "आमच्या सहकाऱ्यानं पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले होते, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का? असं मला विचारलं होतं. भुजबळ गेले ते परत आलेच नाही आणि दुसऱ्या दिवशी शपथच घेतली. चुकीचं काम करताना माणसाला काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी बाकी ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे."
छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : "शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनी केलं. मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो होतो. 2004 मध्ये मला मुख्यमंत्री केलं नाही. मग आर.आर. पाटील आणि अजित पवार यांना का केलं नाही? मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतील म्हणून त्यांनी कुणालाच मुख्यमंत्री केलं नाही,"असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. येवला येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तेलगी प्रकरणात गोवलं : "बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, महापौर केलं. त्याबद्दल मी अनेकदा आभार मानले आहेत. माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं. म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं. पण आता बदनाम करण्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात बोलत आहात. माझा काहीही दोष नसताना तेलगी प्रकरणात मला उगाच गोवलं गेलं. मला राजीनामा द्यायला लावला. प्रफुल पटेल यांनी ताबडतोब बोलावून घेतले. पटेल म्हणाले राजीनामा द्यायला पाहिजे, मी राजीनामा द्यायच्या आधी पवारांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं होतं," असे गंभीर आरोप छगन भुजबळांनी केले.
हेही वाचा -
- 'ना कोई टक्कर में है, ना कोई चक्कर मै'; ... तर अमरिशभाई तालुक्यात एमआयडीसी उभी करतील; स्मृती इराणी यांचं आश्वासन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला 'व्हीव्हीआयपी' पास असूनही प्रतिष्ठित गायकाला 'एन्ट्री' नाकारली, एक चूक पडली महागात
- कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशातील भाजपा कार्यकर्ते फडणवीस यांच्या मतदारसंघात; पाहा व्हिडिओ