पालघर 108 Ambulance Service : राज्य सरकारनं बीव्हीजी ग्रुपला 108 रुग्णवाहिका चालविण्याचं काम दिलंय. राज्यातील 36 जिल्ह्यात 937 रुग्णवाहिका ‘बीव्हीजी ग्रुप’ मार्फत चालवल्या जातात. त्यात ‘बेसिक लाईफ सर्व्हिसेस’ आणि ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सर्व्हिसेस’ अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. एकीकडं या रुग्णवाहिकांचा करार 31 जानेवारीला संपत आहे. त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. तर दुसरीकडं या रुग्णवाहिका व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली आहे.
देखभाल दुरुस्तीअभावी ब्रेकडाऊनचं प्रमाण वाढलं : पालघर जिल्ह्यात एकूण 29 रुग्णवाहिका असून त्यातील 23 ‘बेसिक लाईफ सर्विसेस’च्या रुग्णवाहिका आहेत. तर त्यातील सहा ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट सर्विसेस’ मध्ये मोडतात. जर रुग्णवाहिका अचानक बंद पडली अथवा त्यात काही बिघाड झाला तर पर्यायी म्हणून दोन जादा रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खराब आहे. तसंच ग्रामीण भागात अद्याप आरोग्य सेवा पोहोचलेली नाही. असं असतानाच रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार न मिळाल्यानं त्यांना वाचविणे शक्य होत नाही. रुग्णवाहिकांची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्यानं त्या रस्त्यात अचानक बंद पडतात. त्यातच पर्यायी रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळं उपचाराअभावी अनेकदा रुग्ण आपला जीव गमावतात.
रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त : ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार न मिळाल्यानं अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मोखाडा तालुक्यात एका गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना अधूनमधून घडत असतात. राज्य सरकारनं रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आठ हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. मात्र, या रुग्णवाहिकेची तत्पर सेवा रुग्णांना कधी मिळणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
टोचन करण्याची वेळ : रुग्णवाहिका ज्या विभागाला दिल्या आहेत, त्या विभागात नादुरुस्त रुग्णवाहिका दुरुस्तीची व्यवस्था करण्याऐवजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच ठिकाणी म्हणजे वसईतील मांडवी येथे त्यांची दुरुस्ती करण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे कोठेही रुग्णवाहिका बंद पडली, तरी तिला टोचन करून वसईला न्यावे लागते. नुकताच बोईसरमध्ये बंद पडलेल्या रुग्णवाहिकेला वसईला टोचन करून नेताना व्हायरल झालेला व्हिडिओ या रुग्णवाहिकांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकतो.
ग्रामीण भागात रुग्णवाहिकेत काही बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी मॅकॅनिक भेटत नाहीत. एमआयडीसीत एक वर्कशॉप आहे, पण तेथे मटेरिअल उपलब्ध नाही. त्यामुळं या गाड्या मांडवी येथे नेण्यात येतात.- लक्ष्मण जाधव, एरिया मॅनेजर , पालघर जिल्हा बीव्हीजी
लॉगबुक मेंटेनची व्यवस्था नाही : या रुग्णवाहिकांसाठी पालघर जिल्ह्यात 62 चालक दिले असले, तरी ते व्यवस्थित काम करतात की नाही? लॉगबुक मेंटेंन करतात की नाही? याबाबत कोणाचंच लक्ष नसल्याचा आरोप रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केलाय. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना प्राथमिक उपचार देणे, त्यांचा जीव वाचवणे, पुढील जोखीम कमी करण्यास मदत करणे, रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास हातभार लावणे अशा प्राथमिक अपेक्षा या 108 रुग्णवाहिका चालवणाऱ्या यंत्रणेकडून आहे. मात्र ते होताना दिसत नसल्याचा दावा ढगे यांनी केला.
वादाच्या भोवऱ्यात : दरम्यान, जिल्ह्यातील कोणत्याही भागात अपघात किंवा अन्य काही घडल्यास काही मिनिटांत सेवा देणारी 108 रुग्णवाहिका सेवा आता मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. "सरकार प्रत्येक जिल्ह्याला रुग्णवाहिका पुरवत असते. परंतु त्यांची देखभाल, दुरुस्ती होत नसेल तर रुग्णांना ती वेळेवर कशी उपलब्ध होईल, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळं प्रशासनानं आणि आरोग्यमंत्र्यांनी याकडं लक्ष द्यावं", अशी मागणी ढगे यांनी केली आहे.
हेही वाचा -