पालघर Damans Liquor Seized in Palghar : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असताना पालघर जिल्ह्यात दमणच्या अवैध मद्याचा सुळसुळाट झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध मद्य आणि अन्य साहित्य मिळून सुमारे तीस लाख 32 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. मात्र, मद्याचे बॉक्स उतरवणारे आणि त्यांना मदत करणारे घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मद्य आणि पैसा यांचा वापर जास्त होत असतो. निवडणूक आयोगाचे भरारी पथक तसंच पोलिसांची पथकं या काळात विशेष कार्यरत असतात. अवैध मद्य आणि अन्य बाबींवर त्यांचं लक्ष असतं. या सर्व यंत्रणा कार्यरत असताना उत्पादनशुल्क विभागाचं मात्र कुठंच अस्तित्व दिसत नाही.
गोपनीय माहितीवरून रचला सापळा : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पालघर परिसरात अवैध मद्य येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कपिल नेमाडे, संदीप सरदार, संजय धांगडा, बजरंग अमनवाड यांच्या पथकानं पाळत ठेवायला सुरुवात केली होती. तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली.
दोन जीपसह मद्य साठा जप्त : बोलेरो जीप (क्रमांक एम एच 18 बीजी 4931) मधून दमण येथील विविध कंपन्यांचे बनावट मद्याचे बॉक्स उतरवून ते बोलेरो जीप (क्रमांक एम एच 48 सीक्यू 409) मध्ये भरले जात होते. दमण मद्याच्या विविध कंपन्यांचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले. या दारूची किंमत पाच लाख 32 हजार 80 रुपये आहे. दोन बोलेरो जीपसह मद्य मिळून पोलिसांनी तीस लाख 32 हजार 80 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. ही कारवाई करताना अवैध दारूचे बॉक्स उतरवणारे तीन जण आणि त्यांना मदत करणारे इतर मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलीस अंमलदार बजरंग अमनवाड यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उत्पादन शुल्कचा कानाडोळा : अन्य राज्यातून येणाऱ्या अवैध मद्यावर खरेतर उत्पादनशुल्क आणि सीमा तपासणी पथकाचं लक्ष असायला हवं. पालघर जिह्याला लागून दमण-दीव आहे. त्यामुळं तिथून अवैध मद्य मोठ्या प्रमाणात येत असतं. सीमा तपासणी नाक्यावरून ते अवैध मद्य येतंच कसं? उत्पादनशुल्क विभाग नेमकं करते तरी काय? असा प्रश्न यानिमित्तानं आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा -