ठाणे Organ Donation : मानवी शरीर मृत्यूनंतर देखील अनेकांना जीवनदान देऊ शकतं, याचा प्रत्यय आज ठाण्यात आला. भावीन भानुशाली या (26 वर्ष) विद्यार्थ्याचं अपघातात निधन झालं होतं. त्यामुळं त्याच्या कुटुंबीयानी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. यातून सात जणांना भावीनच्या अवयदानाचा फायदा झाला आहे. 15 जानेवारी रोजी रात्री भावीनचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेत समाजापुढं एक आदर्श ठेवला आहे.
अवयवदान करून इतरांना जीवनदान : आपल्या देशात अवयवदानाचं महत्त्व फारसं लोकांना माहीत नाही. मृत्यूनंतर अवयवदान करून इतरांना जीवनदान मिळू शकतं. परंतु समाजात पसरलेल्या अनेक गैरसमजामुळं या दिशेनं कोणीही विचार करत नाही. ठाण्याच्या भानुशाली कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाचं अवयवदान करून इतरांना फायदा करुन दिला. 26 वर्षीय भावीन भानुशाली हा मास मीडियाचा विद्यार्थी होता, तसंच तो चार वर्षांपासून अमेरिकेत राहात होता. भारतात परतल्यावर त्याच्या कुटुंबानं त्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीनंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. मात्र बाईकवरून घरी जात असलेल्या भावीनचा आशर आयटी पार्क येथे भीषण अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं तो आठ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज भावीनचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबानं त्याचं अवयदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टर, नातेवाईकांचं योगदान : त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांसह भानुशाली समाजातील काही लोकांनी भावीनचे अवयवदान करण्याचं आवाहन कुटुंबीयांना केलं होतं. संपूर्ण कुटुंबानं विचार केल्यानंतर अवयदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं तब्बल सात जणांना फायदा झाला आहे. डोळे, हृदय, किडनी, फुफ्फुस, त्वचा यासारखे मानवी शरीरातील अवयवदान करून इतरांचे प्राण वाचवता येतात. त्यामुळं नागरिकांनी देखील अवयवदानाचं महत्व लक्षात घ्यावं, असं अवाहन भावीनच्या कुटुंबानं केलं आहे. त्यांनी केलेल्या अवयदानामुळं समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
हेही वाचा -