मुंबई Opposition on Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प आज मांडला. यावरुन आता महाविकास आघाडीनं टीका केलीय. आजचा अर्थसंकल्प हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची बोचरी टीका उध्दव ठाकरे यांनी केली. आज थापांचा महापूर आला होता, आश्वासनांची अतिवृष्टी झालेली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी कशी करणार याची तरतूद केलेली नाही असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली.
अर्थसंकल्प नव्हे जुमला संकल्प : अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "रेटून खोटं बोलून जनतेला पुन्हा लुबाडायचं ही सरकारची प्रवृत्ती आहे. या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घोषणा केलेल्या किती योजनांची अंमलबजावणी झाली याची तज्ञांची समिती नेमून अहवाल तयार करुन श्वेतपत्रिका जाहीर करावी. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद कधी करणार याचं उत्तर सरकारनं द्यावं, महिलांना आपल्याकडं वळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांसाठी योजना आखण्याची गरज होती. मात्र त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही देण्यात आलेलं नाही." तसंच महाराष्ट्र लुटणाऱ्यांना त्यामध्ये सहभागी झालेल्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही, असंही ते म्हणाले. सरकारनं वीज बिल माफ करण्याची योजना मंजूर केली. मात्र, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली नाही, राज्यातील जनता आता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे. आजचा अर्थसंकल्प हे लबाडाघरचं आवतन आहे. हा अर्थसंकल्प नाही तर जुमला संकल्प असल्याची टीका ठाकरेंनी केली. हा गाजरांचा अर्थसंकल्प असून योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद केलेली नाही, महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर गेला आहे. वारकऱ्यांसाठी वीस हजार रुपये प्रति दिंडी देण्याची घोषणा हा वारकऱ्यांचा अपमान आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा विकत घेण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. त्याचप्रमाणे मौलाना आझाद महामंडळाच्या निधीमध्ये वाढ करण्यात आल्यानं सरकारनं हिंदुत्व सोडलं का असाही प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारचं नेटवर्क पूर्ण आहे, सरकारला असा हिसका देऊ की निवडणुकीत सरकारला गचका मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
घोषणांचा पाऊस - नाना पटोले : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अर्थसंकल्पावर टीका करत हा अर्थसंकल्प घोषणांचा पाऊस असल्याचं म्हटसंय. राज्यातील काही जिल्ह्यात अद्याप पाऊस नसताना विधानसभेत फेकू सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला आहे. कॉंग्रेसनं दिलेल्या आश्वासनांपैकी काही घोषणांची घोषणा सरकारनं केली आहे. राज्यातील एकनाथ शिंदे सरकार 60 टक्के कमिशनचं सरकार आहे. तेलंगणा सरकारप्रमाणे शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करा अशी मागणी आम्ही केली होती, मात्र त्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलं. सरकारनं तोंडाची पानं पुसल्याची टीका नानांनी केली. नोकरभरतीच्या नावानं बेरोजगार तरुणांना लुटलं जातेय. बोगस, पोकळ आणि निवडणुक जुमल्यांचा हा अर्थसंकल्प आहे. मोघम अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती तरतूद याची माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळं सोमवारपासून या अर्थसंकल्पाचं आम्ही पोस्टमार्टेम करणार आहोत. राज्यातील जनतेची दिशाभूल सरकार करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
हेही वाचा :