पुणे Olympic Medalist Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकममध्ये चमकदार कामगिरी करुन स्वप्निल आता मातृभुमीत दाखल झाला. गुरुवारी सकाळी स्वप्निलचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिथून तो थेट श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात दाखल झाला. तिथं त्यानं दगडुशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.
दगडुशेठ मंदिरात केली आरती : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक मिळालं. तसंच वैयक्तिक पदक मिळवणारा तो महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस येथून स्वप्निल गुरुवारी भारतात परत आला असून, पुणे विमानतळावर स्वप्निलचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यानंतर स्वप्निलनं पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली.
बाप्पानं सर्वकाही दिलं : दगडुशेठ हलवाई ट्रस्टकडून स्वप्निलचं स्वागत करण्यात आलं. यावेळी स्वप्निलनं 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत जोरदार जयघोष केला. "बाप्पामुळंच सर्व काही शक्य झालं. त्यामुळं सुरुवातीला बाप्पाला भेटायला आलो आहे. जे मागितलं ते गणपतीनं आजपर्यंत दिलं आहे," अशी प्रतिक्रिया स्वप्निलनं बाप्पाच्या दर्शनानंतर दिली.
भारताला मिळवून दिलं तिसरं पदक : कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातली होती. या ऑलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यानं एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली. यानंतर स्वप्नीलचं राज्य तसंच देशभरातून अभिनंदन करण्यात आलं. तसंच खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकणारा स्वप्नील महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू ठरला.
हेही वाचा :
- अभिनव बिंद्राला पाहण्यासाठी सोडली होती बारावीची परीक्षा, महाराष्ट्राच्या 'धोनी'नं कसं जिंकलं पॅरिस? - Paris Olympics 2024
- पॅरिसमध्ये मराठी डंका... कोल्हापूरच्या सुपुत्रानं अचूक 'नेम' लावत रचला इतिहास, भारताला मिळालं तिसरं पदक - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी; मायदेशी परतल्यानंतर 'असं' होणार स्वागत - paris olympics 2024