मुंबई: भाजपाचा तीव्र विरोध डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर नवाब मलिकांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिलीय. माजी मंत्री नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून दोन अर्ज दाखल केलेत. त्यापैकी एक अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि एक अर्ज अपक्ष म्हणून दाखल करण्यात आलाय. दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी नवाब मलिक यांनी एबी फॉर्म सादर केलाय. नवाब मलिक यांनी दुपारी दोन अर्ज दाखल केलेत. त्यानंतर ते म्हणाले की, पक्षाने वेळेत एबी फॉर्म दिला आणि तो दाखल करण्यात आला तर पक्षाकडून लढेन, अन्यथा अपक्ष उमेदवार म्हणून लढेन, असे मलिक यांनी स्पष्ट केले होते. मात्र तीन वाजण्याच्या सुमारास मलिक यांनी एबी फॉर्म सादर केला, त्यामुळे मलिक हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झालंय.
महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात : नवाब मलिक यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत पूर्णतः गुलाबी वातावरण होते, त्यामुळे मलिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याची शक्यता वर्तवली जात होती. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतर्फे सुरेश पाटील यांना उमेदवारी अर्ज दिलाय. या मतदारसंघात मलिकांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली असल्याने महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.
वर्षभराच्या कालावधीनंतर मलिक कारागृहाच्या बाहेर : महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे वर्षभराच्या कालावधीनंतर मलिक कारागृहाच्या बाहेर आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांच्या जामिनाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता ते जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे भाजपाने मलिकांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोध केला होता. मंगळवारी प्रवीण दरेकर यांनीदेखील भाजपाचा मलिकांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे स्पष्ट केलंय. त्यामुळे मलिक हे अपक्ष निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा विरोध धुडकावून लावत अखेरच्या क्षणी मलिकांना एबी फॉर्म देत पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा-