ठाणे/अमरावती : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकानं महाराष्ट्रासह देशभरातील पाच राज्यांमध्ये कारवाई केली आहे. एनआयएच्या पथकानं भिवंडी आणि अमरावती कारवाई करून दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
6 ते 7 जणांना अटक : एनआयएच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतच्या हद्दीतून छापा मारला. यावेळी सापळा रचत संशयित तरुणाला आज पहाटेच्या सुमारास पथकानं ताब्यात घेतलं. ककामरान अन्सारी असं एनआयएच्या पथकानं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. काही महिन्यापूर्वी भिवंडी तालुक्यातील पडघा - बोरिवली गावातून 'आयसिस' दहशतवादी संघटनेच्या 6 ते 7 जणांना अटक केली होती.
- दुसरीकडं एनआयए पथकाकडून अमरावतीत एका युवकाची पाकिस्तानशी संबंध असल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. एनआयएचं पथक शुक्रवारी पहाटेच अमरावतीत दाखल झालं आहे.
पहाटे साडेतीन वाजता युवकाला अटक - पाकिस्तानशी संबंध असणाऱ्या देशभरात विविध ठिकाणी एनआयएच्या पथकानं धाडसत्र राबवून 24 ते 25 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. अमरावती शहरातील छाया नगर परिसरात राहणाऱ्या एका युवकाला देखील पाकिस्तानसोबत संबंध असल्याच्या माहितीवरून ताब्यात घेण्यात आलं. एनआयएचं पथक आणि राजापेठ पोलिसांच्या वतीनं संयुक्त कारवाई दरम्यान या युवकाला पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आलं. छाया नगर परिसरातील 35 वर्ष युवक गत काही दिवसांपासून पाकिस्तानमधील काही संघटनांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. या युवकाचा नेमका कोणत्या संघटनांशी संपर्क होता? या संदर्भात एनआयएचं पथक चौकशी करत आहे.
2022 मध्ये आलं होतं एनआयएचं पथक - यापूर्वी अमरावती शहरात एनआयएचं पथक 2022 मध्ये उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलं होतं. आता पुन्हा एकदा एनआयएचं पथक अमरावतीत दाखल झालं. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाची बराच वेळेपासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात नेमकं काय तथ्य आहे? हे लवकरच स्पष्ट होईल, असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगरात देखील केली कारवाई : एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडून देशभरात विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रात तीन ठिकाणी अशा प्रकारची कारवाई गुरुवारी केली, त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. सातारा परिसरातील एका मदरसा मधून 22 वर्षाच्या युवकाला ताब्यात घेण्यात आलं. काही दिवसांपूर्वी विविध भागांमध्ये अशीच कारवाई झाली होती. त्यातील एका संशयिताच्या संपर्कात आल्यानं या युवकाला ताब्यात घेण्यात आलं. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून सदरील युवकाला एटीएस कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. तेथे विचारपूस आणि चौकशी झाल्यावर पुढील माहिती समोर येईल. मात्र जिल्ह्यात अशा कारवाया वाढल्यानं स्लीपर सेल अस्तित्वात असल्याची भीती यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -