छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल भागातून 15 फेब्रुवारी 2024 रोजी दहशतवादी विरोधी पथकानं मोहम्मद जोएब खान याला अटक केली. त्याच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड झालीय. मोहम्मद जोएब विरोधात शुक्रवारी (12 जुलै) मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रातून छत्रपती संभाजीनगरातील किमान 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीय.
भारतात घडवणार होते मोठा घातपात : एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, लिबियातून जगभरात इसिसचं जाळं पसरवणाऱ्या शोएब खाननं आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची इसीसमध्ये भरती केली. जोएब हा शोएबसाठी स्लिपरसेल म्हणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोएबच्या मदतीनं शोएबनं माथेफिरू तरुणांची एक टोळी तयार केली. जोएबनं छत्रपती संभाजीनगरातील धार्मिक कट्टर असलेल्या जवळपास 50 माथेफिरू तरुणांना आपल्या सोबत जोडलं. तसंच देशात घातपात घडवून अफगाणिस्तान किंवा तुर्की इथं पळून जाण्याचा त्यांचा कट होता.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधून प्रशिक्षण : मोहम्मद जोएब यानं वेगवेगळ्या भागातून 50 युवकांना आपल्या सोबत जोडलं. त्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन या ग्रुपच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी स्फोटकांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण तो युवकांना देत होता. विशेष म्हणजे जोएबला ताब्यात घेतल्यानंतर शहरात जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तसंच जोएब हा अगोदर बंगळुरुमध्ये नोकरी करत होता. त्यानंतर त्यानं वर्क फ्रॉम होम घेऊन छत्रपती संभाजीनगरात इसीसचं जाळं पसरवण्याचं काम सुरू केलं, असंही या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा -