नवी मुंबई : सरकारच्या अधिसूचनेनुसार शहरात 125 डीबी पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचं उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फटाके विक्री करणाऱ्या सर्व व्यावसायिक, नागरिकांना नवी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतला आहे. हा दीपोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा, असं महापालिकेच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
वाढत्या वायूप्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्या : सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात, हे वायू प्राणी आणि वनस्पती या दोघांना घातक आहेत. इतर वेळी सरासरी 91 इतका हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) असतो. मात्र दिवाळीच्या सणादरम्यान फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी घटकांपासून निघणाऱ्या वायू प्रदूषणामुळे त्यात सरासरी 212 इतकी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
संध्याकाळी 7 ते रात्री 10 या काळातच परवानगी : उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी नियमांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करायाचे नाही. परवानगी असलेल्या फटाक्यांची महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करायची आहे. याबाबत राष्ट्रीय हरीत लवाद मुख्य खंडपीठ, नवी दिल्ली यांच्या 3 नोव्हेंबर 2023 रोजी आदेश दिलेला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल करुन घेतलेली जनहितार्थ याचिकेनुसार नागरिकांनी केवळ संध्याकाळी 7 ते रात्री 10 या कालावधितच फटाके वाजवायचे आहेत.
पर्यावरणाच्या हानीबाबत करायचं प्रबोधन : फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करायचं आहे. याबाबत पोलीस प्रशासनानं अंमलबजावणी करायची आहे. या आदेशाच्या कलम 8 नुसार याची अंमलबजावणी होणेबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्तांनी देखील पडताळणी करुन दक्षता घ्यायची आहे. त्याचप्रमाणं उच्च न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेच्या अनुषंगानं करावयाच्या उपाययोजना, अंमलबजावणी तसेच दंडात्मक तरतुदी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आयुक्तांनी केले आवाहन : महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान 5.0', 'स्वच्छ सर्वेक्षण 2024' आणि 'स्वच्छ वायू सर्वेक्षण’ अभियानांतर्गत' फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिवल) सण-उत्सव साजरे करायचे आहेत. त्यानुसार नागरिकांनी मातीचे दिवे पणत्या उजळवाव्यात, प्लास्टिकचा वापर टाळून कागदी किंवा कापडी आकाश कंदील लावावेत, फटाक्यांचा वापर टाळावा, प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, झाडांवर विदयुत रोषणाई करु नये, सण - समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी केलं आहे.
हेही वाचा :