अमरावती Amravati Education News : अमरावती शहरासह विभागातील सर्वच प्रमुख शहरातील अनेक तालुक्यांच्या ठिकाणी कला, वाणिज्य, शाखेच्या पारंपरिक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या घटली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी आम्ही महाविद्यालयात वर्षभर येणार नाही. केवळ परीक्षा देऊ, अशी अनेक विद्यार्थ्यांची भूमिका आहे. विद्यार्थ्यांची एकूण मानसिकता पाहता नवीन शिक्षण धोरण कसे यशस्वी होणार हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. एकूणच या परिस्थितीसंदर्भात अमरावती महिला महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अविनाश मोहरील यांनी 'ईटीव्ही भारत' शी बातचीत केलीय.
शिकून काय अर्थ : कला शाखेतील किंवा वाणिज्य शाखेतील पारंपरिक विषय शिकून तीन वर्षाची पदवी घेतल्यावर आपल्याला कोणती नोकरी लागणार? याचा विचार विद्यार्थी करायला लागले आहेत. अगदी बारावी झाल्यावर एखाद्या मॉलमध्ये किंवा रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करताना तीन ते पाच हजार रुपये या युवक-युवतींना मिळत आहेत. त्यांच्या मोबाईल फोनचा रिचार्ज, एखादा वेळी पिझ्झा खाण्याची इच्छा पूर्ण करण्याइतपत विद्यार्थी स्वतः पैसे कमवत आहेत. गंभीर बाब म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातील पालकांकडं त्यांच्या मुलांना महिन्याला काही पैसे देता येईल, इतके पैसेच नाहीत. त्यामुळं मुलांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे हवे आहेत. तीन वर्ष अभ्यास करून पदवी मिळवल्यावर हमखास नोकरी मिळेल का? याची शाश्वती या विद्यार्थ्यांना कोणीही देऊ शकत नाही. यामुळंच पारंपरिक शिक्षण घेऊन काय अर्थ? दुर्दैवानं असा विचार युवक करायला लागले आहेत.
नवीन शिक्षण धोरण राबवायचं कसं : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासून करायची आहे. डॉ. कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वात हे अतिशय उत्कृष्ट शिक्षण धोरण तयार झालं आहे. या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना आता रोजगाराभिमुख शिक्षणाची हमी दिली जाणार आहे. एखाद्या व्यवसायात विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. याबाबत महत्त्वाचे धडे या शिक्षण पद्धतीद्वारे दिले जाणार आहेत. आज 27 ते 28 टक्क्यांवर असणारे उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण हे 2030 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत या धोरण अंतर्गत न्यायचे आहे. असं असताना विद्यार्थी महाविद्यालयातच आलेच नाहीत तर नव्या शिक्षण धोरणाचा उद्देश कसा यशस्वी होईल? हा मोठा गंभीर प्रश्न असल्याची चिंता डॉ. मोहरील यांनी व्यक्त केलीय.
अभियांत्रिकी महाविद्यालयातही हीच परिस्थिती : कला, वाणिज्य या पारंपरिक विद्याशाखेच्या महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे. अमरावती शहरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातदेखील विद्यार्थी मिळत नाहीत. अभियांत्रिकीच्या विशेष अशा शाखेत पदवी मिळवली तर भविष्य उज्वल होऊ शकतं. इतर शाखांचा अभ्यास करून अर्थ नाही, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता होणं हा चिंतेचा विषय असल्याचं डॉ. मोहरील म्हणाले.
'या' महाविद्यालयांची परिस्थिती गंभीर : विज्ञान शाखेचे इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी खासगी शिकवणी लावतात आण म्हणतात, आम्हाला महाविद्यालयात जायचे नाही. केवळ बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला महाविद्यालयात जाऊन परीक्षा देऊ, अशी मानसिकता विद्यार्थ्यांची झाली आहे. यामुळं कुठल्याही खासगी महाविद्यालयात आम्ही वर्षभर येणार नाही, अशी आधीच अट घालून प्रवेश घ्यायचा. ट्युशन क्लासच्या भरवशावर अभ्यास करायचा, असा नवा ट्रेंड आलाय. यामुळंदेखील आम्हाला महाविद्यालयाची गरजच नाही, असा विद्यार्थ्यांचा समज होत आहे. त्यामुळं शहरातील विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयातदेखील विद्यार्थी सापडणं कठीण झालं आहे. कनिष्ठ महाविद्यालयातच विद्यार्थी येत नाहीत. पुढे पदवी अभ्यासक्रमाच्या विज्ञान असो किंवा कला, वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड रोडावणार असल्याची भीती मोहरील यांनी व्यक्त केलीय.
चिंतनाची गरज : "नवीन शिक्षण धोरण अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता ही मोठी समस्या आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन ही समस्या सोडवण्यासाठी तोडगा काढण्याची गरज आहे. नवीन शिक्षण धोरण यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती या कळीच्या मुद्द्यावर सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. यावर चिंतन करून एकत्रितपणे योग्य तोडगा काढला तर राष्ट्रीय शिक्षण धोरण यशस्वी होऊ शकतं," अशी आशा डॉ. अविनाश मोहरील यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा-