नवी मुंबई Nerul Double Murder Case : नेरुळमधील दोन रियल इस्टेट एजंटच्या हत्येचं गूढ उकललंय. हे दोन्ही इस्टेट एजंट 21 ऑगस्टला प्रॉपर्टीच्या डीलसाठी नेरुळमधून कारनं बाहेर गेले होते. मात्र, ते घरी परत न आल्यानं व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न झाल्यानं त्यांच्या कुटूंबियांनी 22 ऑगस्टला नेरुळ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सुमित जैन(39) यांचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आढळून आला तर आमिर खानजादा(42) यांचा मृतदेह पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्य परिसरात आढळून आला होता. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण? : नवी मुंबई नेरुळ येथे राहणारे रिअल इस्टेट एजंट आमिर खानजादा आणि सुमित जैन हे 21 ऑगस्टला जमिनीच्या व्यवहारासाठी आपल्या गाडीतून निघाले होते. पण ते घरी परतले नाहीत. त्यामुळं ते दोघंही बेपत्ता असल्याची तक्रार नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तपासात सुमित जैन यांचा मृतदेह पेणमधील गागोदे गावाजवळ 23 ऑगस्टला सापडला व आमिर खानजादा यांचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात 28 ऑगस्टला मिळाला. जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक वादामुळं ही हत्या झाल्याचं समोर आलंय.
खोटी कागदपत्रं बनवून करण्यात आला होता व्यवहार : या गुन्ह्यातील संशयित विठ्ठल बबन नाकोडे याला ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही हत्येचे गूढ उकलले. खालापूर परिसरात एका मृत व्यक्तीच्या नावे असलेली जमीन ती व्यक्ती जिवंत आहे असे दाखवून, खोटा व्यवहार सुमित जैन यानं केला होता. या व्यवहाराचे पैसे सुमित जैन याला मिळाले होते. या संदर्भात आमिर खानजादा यालाही माहिती होती त्यामुळं पैशाच्या देवाणघेवाणीवरून सुमित जैन व आमिर यांच्यात वाद झाले होते. त्यातूनच सुमित जैन याने विठ्ठल नाकोडे याची मदत घेऊन कट रचला व आमिर खानजादा याला मारून टाकण्याची सुपारी दिली. ही सुपारी आनंद उर्फ अँड्री राजन यांच्या माध्यमातून देण्यात आली होती
कसा केला गेम? : नेरूळवरून निघतानाच गाडीमध्ये सुनसान ठिकाण बघून आमिर याला गोळी झाडण्यात आली व त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला. हा सर्व प्रकार अंगलट येवू नये म्हणून गाडीत येऊन सुमित जैन यानं स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतली. सुमित जैन व मारेकरी यांच्यात पुन्हा पैशावरून वाद झाले. त्यामुळं मारेकऱ्यांनी सुमित जैन यालाही भोसकलं. पायावरील गोळी मारल्यामुळं झालेली जखम व भोसकल्यामुळं झालेली जखम यामुळं सुमित जैन याच्या अंगातून प्रचंड रक्त निघालं. त्यामुळं सुमित जैन याचाही मृत्यू झाला व दोन्ही मारेकऱ्यांनी सुमित जैन याचा मृतदेह पेणजवळील गागोदे गावाजवळ फेकला.
पाच जणांना घेतलं ताब्यात : या प्रकरणात विठ्ठल बबन नाकाडे(34), जयसिंग उर्फ राजा मधु मुदलीयार(38), आनंद उर्फ अँण्ड्री राजन कूज(39), वीरेंद्र उर्फ गोया भरत कदम(24) आणि अंकुश उर्फ अंक्या प्रकाश सितापुरे (35) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.