जळगाव Nepal Bus Accident Jalgaon 27 Died : नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंची बस नदीत कोसळली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. नेपाळमधील पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला. दरम्यान, अपघातातील 27 भाविकांचे मृतदेह शनिवारी (24 ऑगस्ट) रात्री जळगावमधील वरणगावात दाखल झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी नागरिकांचा आक्रोश बघायला मिळाला.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, पिंपळगाव, आचेगाव, भुसावळ, सुखळी आदी भागातील 80 भाविक हे देवदर्शनासाठी 16 ऑगस्ट रोजी भुसावळ इथून ट्रेननं प्रवास करत अयोध्या इथं पोहोचले. अयोध्या इथं दर्शन घेतल्यानंतर ते नेपाळ इथल्या पशुपतिनाथाच्या दर्शनासाठी निघाले. यापैकी 40 नागरिकांची बस काठमांडू येथील खैरणी नदीमध्ये अपघात होऊन कोसळली. या भीषण अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल, भुसावळ आणि सुकळी इथल्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांचे पार्थिव नाशिक इथं विमानानं आणले जाणार होते. मात्र, वेळ परिस्थिती आणि पाऊस लक्षात घेता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हे सर्व पार्थिव जळगाव इथं विमानानं आणले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले.
रक्षा खडसे काय म्हणाल्या ? : मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र शासनाकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी घोषणा करतील. या घटनेत जळगावमधील 27 जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगी सध्या बेपत्ता आहे. तर उर्वरित जखमींवर नेपाळमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी दिली.
मृतांचा आकडा वाढला : नेपाळमधील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मृत व्यक्तींचा आकड्यात वाढ झाल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिलीय. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना एकनाथ खडसे म्हणाले की, "नेपाळमधील अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी आणखी तीन जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळं अपघातातील मृतांचा आकडा आता 30 वर पोहोचलाय. या अपघातात मृत्यू झालेले ड्रायव्हर आणि कंडक्टर बाहेरच्या राज्यातील आहेत. तर त्यातील एक जळगावच्या वरणगावमधील आहे."
हेही वाचा -
- नेपाळ बस दुर्घटना : रक्षा खडसे यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट; पाहा व्हिडिओ - Nepal Bus Accident
- नेपाळ बस अपघात : 24 जणांच्या मृत्यूनं वरणगावावर शोककळा, भावासोबतचा 'तो' व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा; रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल - Nepal Bus Accident
- नेपाळ बस दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू, वायुसेनेच्या विमानानं शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार - Nepal Bus Accident