मुंबई MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "राज्यपालांच्या अखत्यारित येत असलेले काही विषय महाराष्ट्राच्या हितासाठी होते. त्यासाठी आज काही पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्र सरकारने पेपरफुटी संदर्भात जो कायदा केला तो राज्यात लागू व्हावा यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत. उत्तराखंडमधील राज्यपालांनी स्वतःहून पुढे येऊन तशा प्रकारचा कायदा केला आहे. त्याच धर्तीवर येत्या अधिवेशनात राज्यपालांनी पुढाकार घेतला पाहिजे किंवा राज्य सरकारला तशा प्रकारे आदेश दिला पाहिजे. पेपर फुटीवर लवकरात लवकर कायदा करावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही त्यांची भेट घेतली. गेल्या वेळच्या अभिभाषणात राज्यपालांनी राज्यात विविध महामंडळ करावी अशा प्रकारचा आदेश राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारने विविध महामंडळ केली. मात्र, तुटपूंजा पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला."
200 कोटींच्या निधीसाठी राज्यपालांना विनंती : राज्य सरकार महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करत असून येथे अधिवेशनात या सर्व महामंडळांना 200 कोटीचा निधी देण्यासाठी या सरकारला भाग पाडावं यासाठी देखील राज्यपालांना विनंती केली आहे. MIDCचा मुद्दा देखील सांगितला. तसेच मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना एमआयडीसी संदर्भात आदेश द्यावा ही विनंती केली. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ड्रग्सचा वापर होत आहे. तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रश्नांवर लक्ष घाला अशी विनंती केली. माझ्या मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्नावर देखील चर्चा झाली. राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा झाली. सरकारशी बोलू असं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
गृहमंत्र्यांनी पदमुक्त व्हावे : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला पदमुक्त करावं, अशा प्रकारची विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती. राज्यात गुंडागिरी, कोयता गँग, निवडणूक काळात गुंडांचा वापर केला गेला, त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसेल केलं. मात्र, सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की, तुम्ही पदमुक्त व्हा; कारण की, गृह मंत्रालय खालच्या स्तरावर काम करत आहे. तेथे कोठेही महाराष्ट्रावर लक्ष नसल्यामुळे ड्रग्ज आणि गैरप्रकार वाढत चालल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
विकासकामांसाठी निधीची पूर्तता करावी- रोहित पवार : महायुतीचं शेवटचं अधिवेशन असेल; कारण ते पुढे सत्तेत नसतील. त्यामुळे आमदारांना खुश करण्यासाठी या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात निधी दिला जाऊ शकतो. सरकारने ६० हजार कोटी रुपये अशी कामं कंत्राटदारांना दिलेली आहेत; त्यात कंत्राटदारांना वेळेत पैसे मिळत नाही आणि म्हणून कामं होत नाहीत. अनेक रोड खोदले गेले. कामं पूर्ण न झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. टक्केवारी देऊन तुझे पैसे घेऊन जा अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अधिवेशनात महायुतीतील सर्व आमदारांना अधिकचा निधी दिला जाऊ शकतो; मात्र ते महायुतीमध्ये राहणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. यापूर्वी विकास कामांसाठी दिलेल्या निधीची देखील पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
संजय शिरसाटांची महायुतीत अडचण : आमदार रोहित पवार यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची खिल्ली उडवली आहे. त्यांची फार मोठी अडचण झाली आहे. कपडे शिवले पण मंत्रीपद नाही मिळाले. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर त्यांचा कंट्रोल राहिला नाही. महायुती किती अडचणीत आहे हे सगळ्यांना माहित आहे. महायुतीत बांबूचा वापर कोणी कोणासाठी केला याचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. लोकसभेच्या जागा त्यांच्या का पडल्या याचा अभ्यास त्यांनी करावा. मग कदाचित ते स्वतः बांबू हातात घेतील आणि पुढे काय करायचं ते करतील. लोकशाहीत सामान्य जनतेने लोकशाहीचा बांबू हातात घेऊन महायुतीला घरी बसवल्याचे आपण सर्वांनी बघितलं असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
लोकांच्या कृपेनं आमचं सरकार येणार : महाविकास आघाडीतील सर्व खासदार राज्यातील आरक्षणाचा मुद्दा संसदेत 100% मांडतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. चार महिन्यांसाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना आंदोलन करावं लागेल. त्यानंतर लोकांच्या कृपेनं आमचं सरकार येणार आहे. त्यावेळेस भाजपाच्या सर्व नेत्यांना काय करावं लागेल तेव्हा आपल्याला कळेल; पण मविआ सरकार आल्यानंतर गेल्या तीन वर्षांत सामान्य लोकांना जे काही दुर्लक्षित केलं गेलं होतं, त्यांच्या बाबतीत जे निर्णय घेतले गेले नव्हते. आम्ही सर्वजण मिळून ते निर्णय घेऊच. पण भाजपाचे जे विचित्र वागणारे नेते आहेत आणि त्यांना साथ देणारे अधिकारी जे आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी महायुती आणि अधिकाऱ्यांना दिला आहे.
हेही वाचा:
- विदर्भात कुठेही कत्तलखाना होऊ देणार नाही, वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - Nagpur Kattalkhana
- भुजबळांचं तलवारी घासून ठेवण्याचं आवाहन, तर आम्हीही शांत बसणार नाही असा जरांगेंचा इशारा - Manoj Jarange Patil PC
- "ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News