पुणे Lok Sabha Elections : बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेतलीय. त्यामुळं अजित पवार गटाला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. तसंच बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचं शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं बीडमध्ये राजकीय वातावरणही बदलताना दिसत आहे.
बीडचा चर्चा करुन निर्णय : 'बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते कार्यकर्ते आमच्यासोबत अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळं त्यांना त्यावेळी चांगली मतं देखील मिळाली होती. काही छोट्या-मोठ्या प्रसंगामुळं ते येत नव्हते, आम्ही आग्रह केला त्यामुळं ते आमच्याकडं आल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पण बीडच्या निवडणुकीसाठी आणखी एक महिना बाकी आहे. अनेकांना बीड लोकसभा लढवायची आहे. त्यामुळं अनेकजण भेटायला येत आहेत. जयसिंगराव गायकवाड हेही घरी न थांबता काम करत आहेत. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांची बैठक घेऊन लोकसभेबाबत निर्णय घेतला जाईल', असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
बजरंग सोनवणे शरद पवार गटात : 'आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. पण आता मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. मी अधिक काही सांगणार नाही. पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा मी तालुकाध्यक्ष होतो.अनेकांना ते माहीत नाही. माझा इतिहास पाहता मी भाजपमधून आलो असं, अनेकजण म्हणतील. पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेच्या वेळी मी तालुकाध्यक्ष होतो', असं बजरंग सोनवणे म्हणाले.
बजरंग सोनवणे उमेदवारीसाठी इच्छुक : बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सोनवणे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते आग्रही होते. त्यामुळं शरद पवारांनी बीड लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानं अजित पवार गटाला धक्का बसला आहे. तसंच बजरंग सोनवणे यांनी ट्विट करत अजित पवार यांच्या पक्षाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलंय.
हे वाचलंत का :