मुंबई Nawab Malik in Jan Samman Yatra : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. जनसन्मान यात्रा आज मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात दाखल झाली. यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दोन्ही मतदारसंघात भव्य दिव्य अशा प्रकारच्या सभा पार पडल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक दिसल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला अजित पवार यांनी धुडकवून लावल्याचं बोललं जात आहे.
![Nawab Malik in Jan Samman Yatra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-08-2024/mh-mum-ajitpawar-on-jansanmanyatra-7211728_19082024221430_1908f_1724085870_366.jpg)
सना नवाब मलिक पक्षाची प्रवक्ता : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना महायुतीत सामील करण्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवत टोकाचा विरोध केला. त्याच भूमिकेवर आज देखील ते ठाम असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. त्यामुळे अजित पवार यांच्या कार्यक्रमात नवाब मलिक दिसत नव्हते, मात्र आजच्या जनसन्मान यात्रेच्या मंचावर दोघं एकत्र दिसले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला धुडकावून लावला आहे. नवाब मलिक यांची कन्या सना नवाब मलिक यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून अजित पवार यांनी मोठी घोषणा देखील केली.
![Nawab Malik in Jan Samman Yatra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-08-2024/mh-mum-ajitpawar-on-jansanmanyatra-7211728_19082024221430_1908f_1724085870_513.jpg)
कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही : "लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांनी अल्पसंख्यांकांबाबत अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या. सीएए, एनआरसीबद्दल फेक नरेटिव्ह निर्माण केले. हे फक्त परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी आहे. वक्फ बोर्डाबाबत अल्पसंख्यांकांवर आम्ही कधीही अन्याय होऊ देणार नाही," असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. "कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही," अशा प्रकारची मोठी घोषणा देखील अजित पवार यांनी यावेळी केली.
![Nawab Malik in Jan Samman Yatra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-08-2024/mh-mum-ajitpawar-on-jansanmanyatra-7211728_19082024221430_1908f_1724085870_1055.jpg)
प्रेमाचं दुकान असून फायदा नाही, मनात प्रेम असावं लागते - झिशान सिद्दीकी : काँग्रेस पक्षात खूप अन्याय झाला असून प्रत्येक वेळेस संघर्ष करावा लागला. आता बदल करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी देऊन पक्ष सोडण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या मतदार संघात दाखल झाली. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्याकडून बाईक रॅली काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. झिशान सिद्दीकी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार, अशा चर्चा सुरू होत्या. विधान परिषद निवडणुकीत झिशान सिद्दीकीनं महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत झिशान यांनी सहभाग घेऊन अप्रत्यक्ष काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझं काम थांबवलं जात होतं. विकास निधी मिळत नव्हता, अशा वेळी अजित पवार यांनी आपल्याला मदत केली. येणाऱ्या काळात तुमच्या जोरावरच निवडणूक लढवून जिंकायची आहे. आत्ता बदलाची भूमिका आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांच्या मदतीनं पुढील काम करायचं आहे. फक्त प्रेमाचं दुकान असून फायदा नाही, तर मनामध्ये ही प्रेम असावं लागते, असा टोला झिशान सिद्धीकी यांनी प्रत्यक्षपणे काँगेस नेतृत्वला लगावला आहे.
![Nawab Malik in Jan Samman Yatra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-08-2024/mh-mum-ajitpawar-on-jansanmanyatra-7211728_19082024221430_1908f_1724085870_26.jpg)
![Nawab Malik in Jan Samman Yatra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-08-2024/mh-mum-ajitpawar-on-jansanmanyatra-7211728_19082024221430_1908f_1724085870_185.jpg)
हेही वाचा :