मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, यामध्ये ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय. वांद्रे पूर्व येथून झिशान सिद्दिकी यांना तर अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीतही नवाब मलिक यांचं नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा आहेत. परंतु अजित पवार यांनी या चर्चा तथ्यहीन असल्याचं सांगितलंय. तर सना मलिक यांनी वडील नवाब मलिक निवडणूक लढविणार असल्याचं सांगितलंय.
अजित पवार गटाचे आतापर्यंत ४५ उमेदवार घोषित: राष्ट्रवादी अजित पवार गटाने आज त्यांच्या ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, आतापर्यंत एकूण ४५ उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लगेच त्यांना उमेदवारीसुद्धा देण्यात आली. झिशान सिद्दिकी यांची लढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरुण देसाई यांच्यासोबत होणार आहे. तसेच मुंबई अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यावरून भाजपानेसुद्धा नवाब मलिक यांच्या नावाला आक्षेप घेतला होता. अशात दुसऱ्या यादीतही नवाब मलिक यांचं नाव नसल्याने नवाब मलिक यांचा पत्ता कट केला गेलाय, अशा चर्चा रंगल्या असताना अजित पवार यांनी मात्र या चर्चा तथ्यहीन असल्यास म्हटलं आहे. तर सना मलिक यांनी त्यांचे वडील नवाब मलिक निवडणूक लढवणार असल्याचे म्हटल्याने नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
संजय काका पाटलांचा सामना रोहित पाटील यांच्याशी: झिशान सिद्दिकी, सना मलिक याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महाकाळमधून संजय काका पाटील, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहामधून प्रताप पाटील यांच्या नावाची घोषणा केलीय. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपाचं कमळ सोडून घड्याळ हाती घेतलंय. संजय काका पाटील यांचा सामना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्याशी होणार आहे. रोहित पाटील यांना शरद पवार गटातून उमेदवारी देण्यात आलीय.
हेही वाचा :