नवी मुंबई : चोरी करून महिलेची हत्या करणाऱ्या नराधमाला तब्बल अडीच महिन्यांनी पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केलं आहे. महिलेची छेडछाड करून तिला लुटण्यासाठी ही हत्या केल्याचं आरोपीनं कबूल केलं आहे. न्यायालयानं आरोपीला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण : पनवेल तालुक्यातील वलप गावात राहणाऱ्या संगीता राजेंद्र आगवणे (वय - 49 वर्ष) या महिलेची अज्ञात मारेकऱ्यानं ऑक्टोबर महिन्यात हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. संगीता आगवणे यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन आणि पर्स लुटण्यात आली. पनवेल तालुका पोलिसांकडून या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगीता आगवणे पनवेलमधील वलप गावात कुटुंबासह राहत होत्या. त्या नेहमीप्रमाणे खासगी शिकवणी घेण्यासाठी गावात गेल्या. शिकवणी घेऊन त्या आपल्या घरी परतत असताना, घराजवळच्या कच्च्या रस्त्यावर अज्ञात मारेकऱ्यानं संगीता आगवणे यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन आणि पर्स असा सुमारे 2 लाख रुपये किमतीचा ऐवज लुटला. या वेळी त्यांनी विरोध केल्यानं मारेकऱ्यानं त्यांचं नाक, तोंड दाबून त्यांची हत्या केली आणि मृतदेह रस्त्यालगतच्या झुडपात टाकून पळ काढला.
रात्री उशिरापर्यंत परत न आल्यानं शोध सुरू : संगीता आगवणे या रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्यानं त्यांच्या मुलानं त्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार फोन करूनही त्यांचा फोन बंद असल्याचं आढळून आलं. संगीता यांच्या मुलानं त्यांचा शोध सुरू केला असता, संगीता आगवणे घराच्या दिशेनं येणाऱ्या कच्च्या रस्त्यालगतच्या झुडपात मृतावस्थेत आढळून आल्या.
आरोपीला अटक : "पोलिसांनी या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना मध्य प्रदेशातील रिवा शहरातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे लुटलेले मौल्यवान दागिने आणि मोबाईल फोन असं साहित्य आढळून आलं. त्याची चौकशी केल्यानंतर पोलीस पनवेल तालुक्यातील वलप गावात राहणाऱ्या मुख्य आरोपी शरद साहूपर्यंत पोहोचले. त्याला 21 डिसेंबर रोजी खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे," असं नवी मुंबई क्राईम ब्रांच परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं.
हेही वाचा