छत्रपती संभाजीनगर Nath Shashti Festival 2024 : नाथ षष्ठीच्या (Nath Shashti) अनुषंगानं एकनाथ महाराज यांच्या नाथवंशातील सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आलाय. रघुनाथबुवा गोसावी (Raghunath Gosavi) पालखीवाले आणि रावसाहेब गोसावी (Raosaheb Gosavi) यांनी संस्थानाच्या परंपरागत चालीरीती एकत्रित साजऱ्या करण्याची घोषणा केलीय. त्यामुळं पुन्हा एकदा पारंपारिक सोहळा एकत्रपणे साजरा केला जाणार आहे. दत्तकपुत्र विधानाच्या मुद्द्यावरून दोन्ही वंशांमध्ये १९७१ पासून हा वाद सुरू होता. यात न्यायालयाला देखील हस्तक्षेप करावा लागला होता. मात्र, आता दोन्ही बाजूंनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानं नाथ महाराजांच्या अनुयायांना सुखद धक्का मिळाला आहे. तर दुसरीकडं नातं वंशज असलेल्या त्यांच्याच भावकींनी मात्र, वाद अद्याप मिटला नसल्याचं सांगितलं. त्यामुळं अजून पूर्ण पणे मनोमीलन झालं नसल्याचं बोललं जातंय.
४२५ वा समाधी वर्ष सोहळा एकत्र : नाथ महाराजांचे वंशज यांच्यातील सुरू असलेला वादांमुळं, अनेकवेळा पालखी सोहळा आणि नाथषष्ठीच्या कार्यक्रमात जाहीरपणे वाद आणि भांडणं ही समोर आली होती. त्यात न्यायालयानं हस्तक्षेप करत पालखीचा मान रघुनाथ गोसावी यांना दिला आणि त्यानंतर कुटुंबात असलेले वाद हे विकोपाला गेले होते. हंडी फोडण्यासाठी होणारा वाद पाहता प्रशासनाच्या वतीनं हंडी फोडण्याचा निर्णय काही वेळा घेतला होता. मात्र, यंदा श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचे ४२५ वे वर्ष असल्यानं, वाद बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रघुनाथ बुवा गोसावी आणि रावसाहेब गोसावी यांनी याबाबत एकत्रित येण्याचा निर्णय जाहीर केला. इतकच नाही तर आता कुठलेच वाद राहणार नाहीत, सर्व कार्यक्रम एकत्रितरीत्या आम्ही करू. नाथ महाराजांच्या या समाधी सोहळ्याला उत्सवाचं स्वरूप प्राप्त करून देऊ, असा निर्धार दोन्ही भावंडांकडून करण्यात आलाय.
काही वंशजांनी केला विरोध : नाथ महाराजांचे वंशज यांच्यातील सुरू असलेला वाद तब्बल ५३ वर्षांनी संपुष्टात आलाय. याबाबत दोन्ही वंशाजांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली, असं असलं तरी काही वंशजांनी या निर्णयाचा विरोधात केला आहे. मात्र, मूळ वाद असलेले रघुनाथबुवा गोसावी आणि रावसाहेब गोसावी यांनी आता उतार वयात हा वाद संपल्याचं सांगितलं. या निर्णयाला त्यांच्याच कुटुंबातील अनेकांनी पाठिंबा देखील दर्शवला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा नातं वंशज एकत्र येत संत एकनाथ महाराजांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतील आणि सोहळा उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -