नाशिक Nashik School Reopen : शासनाच्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्वच शाळा आजपासून (15 जून) सुरू झाल्यात. शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्यानं आज शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचं शिक्षकांनी औक्षण करत स्वागत केलं. नवीन गणवेश, नवी कोरी पुस्तकं, नवीन मित्र, जुन्या मित्रांची भेट, चिमुकल्यांना पहिल्या दिवशी शाळेत सोडण्यासाठी आलेले पालक, अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेचा परिसर गजबजला होता. शहरासह ग्रामीण भागातील असंख्य शाळा नव्या रंगात रंगल्या होत्या. शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसंच चित्रांनी सजवण्यात आल्या होत्या. तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
4 लाख 66 हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप : समग्र शिक्षण अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, पूर्णतः अंशतः अनुदानित शाळा, आदिवासी विभाग संचलित आणि अनुदानित आश्रम शाळा, समाज कल्याण विभाग संचलित आणि अनुदानित शाळा अशा एकूण 4 हजार 238 शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 4 लाख 66 हजार 369 विद्यार्थ्यांना 19 लाख 33 हजार 674 पुस्तकांचं वाटप करण्यात येत आहे.
खूप दिवसांनी मित्रांना भेटून आनंद झाला : मी आता दुसरीतून तिसरीत गेलोय. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरच्यांसोबत खूप धमाल केली, मामाच्या गावाला जाऊन आलो. मात्र, मला शाळेच्या मित्रांची खूप आठवण येत होती. आज शाळेचा पहिला दिवस होता. सर्व मित्र भेटले म्हणून मला खूप आनंद झाला. शिक्षकांनी देखील आमचं औक्षण करून स्वागत केलं, हे बघून मी खूप खुश झालो, अशी प्रतिक्रिया एका चिमुकल्यानं दिली आहे.
हेही वाचा -