नाशिक Nashik Crime News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना तसंच गुन्हे शाखा, विशेष पथक, गुंड विरोधी पथकांच्या प्रमुखांना बेकायदेशीर हत्यारं बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात 14 देशी पिस्तूल, 20 काडतूस, 31 कोयते आणि 11 तलवारी अशी घातक हत्यारं जप्त केली आहेत.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये घातक शस्त्र : नाशिकच्या घारपुरे घाट या ठिकाणी एका विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली असता त्याच्या बॅगमध्ये एक कोयता, दोन चॉपर अशी घातक शस्त्र आढळून आली. तसंच गोदापार्क चिंचबन परिसरात एका अल्पवयीन मुलाच्या बॅगेची झडती घेतली असता बॅगेत तीन चॉपर आढळून आले. याप्रकरणी मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलंय. तिसऱ्या प्रकरणात पंचवटी भागातील महानगरपालिकेच्या उद्यानात आपल्याजवळ गुप्ती सारखे घातक हत्यार घेऊन मिरवणाऱ्या बालकाला गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.
हत्येच्या गुन्ह्यात अल्पवयीन बालके : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात राहणाऱ्या निलेश उपाडे या सराईत गुन्हेगाराची 25 मार्चला धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत सहा संशयितांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार विधीसंघर्ष बालकं होती.
पालकांनी मुलांशी संवाद साधणं गरजेचं : वाढत्या बालगुन्हेगारी विषयी मानसोपचार तज्ञ डॉ हेमंत सोननीस यांच्याशी संवाद साधण्यात आला असता ते म्हणाले की, "तरुण वयात होणारे हार्मोन्स बदल या निसर्गाप्रमाणे घडणाऱ्या गोष्टी आहेत. मात्र, अनेक गोष्टी या आजूबाजूच्या वातावरणामुळंही घडतात. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, मोबाईल, वेब सिरीज यांच्या माध्यमातून अनेकदा हिंसाचार दाखवला जातो, आणि या सर्व गोष्टींचा थेट मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. यावर पर्याय म्हणजे पालकांनी मुलांशी सातत्यानं संवाद साधणं गरजेचं आहे. तसंच शाळेतून किंवा महाविद्यालयातून मुलं घरी आले की त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करावी. जर प्रत्येक मुलानं आयुष्याची वाटचाल करताना आपलं उद्दिष्ट लक्षात ठेवून फोकस केलं तर बाल गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल", असं मत त्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा -