नाशिक Crime News : मोबाईल फोडल्याच्या वादातून सोनाली भानुदास काळे (२४, रा. दत्त मंदिर, नाशिकरोड) यांच्या हत्येप्रकरणी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चार तासांत या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरच्या मंडळींनी (16 तारखेला) दिली होती. त्यानंतर तिचा मृतदेह नाशिकरोडवरील एका बांधकामाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत वायरनं बांधलेल्या गोणीत आढळून आला होता.
मृतदेह गोणीत बांधून दिला फेकून : याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नाशिकरोड परिसरातील गुरुद्वारासमोरील बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीत सोमवारी, (19 तारखेला) एका महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आला होता. दोन दिवसांपूर्वी ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हत्येनंतर सुरुवातीला पोलिसांनी सोनाली काळे यांचे पती आणि सासूला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाची चौकशी केली. त्यावेळी मुलानं महिलेच्या डोक्यात हातोडीनं वार करून तिचा मृतदेह गोणीत बांधून जवळील पाण्याच्या डबक्यात फेकून दिल्याची कबुली दिलीय.
डोक्यावर हातोड्यानं तीन वार : सोनाली काळे या शुक्रवारी म्हणजे (16 तारखेला) दुपारी चार वाजता पतीला बोलावण्यासाठी अल्पवयीन मुलाकडं मोबाईल मागण्यासाठी आल्या होत्या. मात्र, सोनाली काळे आणि अल्पवयीन मुलात वाद झाला. त्यामुळं सोनाली काळे यांनी अल्पवयीन मुलाचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. त्याचा राग आल्यानं या मुलानं सोनाली काळे यांच्या डोक्यावर हातोड्यानं तीन वार केलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे वाचलंत का :
- सहलीत विद्यार्थिंनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक, शालेय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची पालकांची मागणी
- पुणे ड्रग्स प्रकरणाचं आढळलं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, कुरिअर कंपनीद्वारे 'या' शहरात जाणार होते अमली पदार्थ
- अमली पदार्थांच्या तस्करीत पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई, 1100 कोटींचे 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त