नंदुरबार : नंदुरबारपासून काही अंतरावर असलेल्या पिंपळोद गावाजवळ भरधाव येणाऱ्या बोलेरोनं रस्त्याच्या कडेला 3 मोटरसायकलसह उभ्या असलेल्या युवकांना (Nandurbar Accident) चिरडलं. हा अपघात शनिवारी रात्री घडला. अपघातात सुमारे सात ते आठ जण जखमी झाले होते. यापैकी 5 जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं? : नंदुरबार-धानोरा रस्त्यावर पिंपळोदपासून एक किमी अंतरावर एक दुचाकी नादुरुस्त झाली होती. अंधार असल्यानं दुचाकीस्वारानं मदतीसाठी आपल्या मित्रांना बोलावलं. दोन दुचाकी त्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्यावेळी नंदुरबारकडून धानोराकडं भरधाव वेगात जाणारी बोलेरो (जी.जे.02, झेड.झेड.0877) यावरील चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलसह इतर उभे असलेल्यांनाही थेट चिरडलं. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असं डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलं. तर या अपघातातील एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये रस्त्याकडेला उभ्या केलेल्या तिन्ही दुचाकींचा चक्काचुर झाला आहे. तर बोलेरो गाडीचंही मोठं नुकसान या अपघातामध्ये झालंय. ऐन दिवाळीत एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्यानं गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
मृत युवकांची नावं : या भीषण अपघातात योगेश कालूसिंग नाईक (वय-40, रा. पिंपळोद, ता. नंदुरबार), राहुल धर्मेंद्र वळवी (वय-26, रा. पिंपळोद, ता. नंदुरबार), अनिल सेन्या मोरे (वय-24, रा. शिंदे, ता. नंदुरबार), चेतन सुनील नाईक (वय-12, रा. भवाली, ता. नंदुरबार), श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे (वय-40, रा. पिंपळोद, ता. नंदुरबार) यांचा मृत्यू झालाय. रात्रीच्या वेळी भरधाव वेगानं गाड्या चालवल्यामुळं अपघात होताना आपण पाहिलं आहे. मात्र या अपघातात गाडीमध्ये बिघाड झाल्यानं एका ठिकाणी उभ्या असलेल्या निष्पाप तरुणांचा बळी गेल्यानं असा अवस्थेत काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा -
- समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार ; उभ्या ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात, वाहतूक खोळंबली
- सातारा ठोसेघर मार्गावर भीषण अपघात, खड्डा चुकवताना दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार, पाच जण गंभीर जखमी - Satara Road Accident
- प्रवासी बस पुलावरुन कोसळली नदीत; सेमाडोहमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू, शिक्षकांचा समावेश - Bus Fell In River At Semadoh